लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. त्या प्रमाणात नागरिकांचे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण मात्र कमी होत असून ही एक दिलासादायक बाब आहे. सलग तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्हिटी दर हा कमी आला आहे. १६ जून २०२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा १६.२१ टक्के इतका होता. तो २२ जून रोजी ४.६९ टक्क्यांवर आला आहे. मात्र मृतांची संख्या कमी करणे हे प्रशासनासमोरचे एक आव्हान बनले आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ही नेहमी वाढतीच राहिली आहे. मे महिन्यात ५० हजारावर नागरिकांना कोरोना लागण झाली होती. त्याच पध्दतीने गेल्या २० दिवसात २७ हजाराहून अधिक जणांना कोरोना झाला आहे. परंतू १४ जून २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर मात्र प्रशासनानेही कठोर भूमिका घेत कोरोना नियंत्रणाबाबत आखणी केली आहे.
उपमुख्यमंत्री पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत चाचण्या वाढवा आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशा सक्त सूचना पवार यांनी केल्या होत्या. कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी दर जास्त असल्याने चाचण्या वाढवून संसर्ग रोखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.
यानंतर जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून ॲंटिजन चाचण्यांचे किट मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आले असून शहरासह जिल्ह्यात या चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. अधिक संख्येने चाचण्यात होत असतानाही तुलनेत कमी प्रमाणात नागरिक पॉझिटिव्ह येत असल्याने सलग तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्हिटी दर हा कमी आला आहे.
चौकट
आठवड्यातील पॉझिटिव्हिटी दर
दिनांक पॉझिटिव्हिटी दर टक्के
१६ जून १६.२१
१७ जून १२.८५
१८ जून १०.९
१९ जून १०.७८
२० जून १०.३७
२१ जून ६.६१
२२ जून ४.६९
चौकट
आकडेवारी अद्ययावत करण्याच्या सूचना
देशभरातील कोरोना रुग्णांची सर्व आकडेवारी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वेबसाईटवर अद्ययावत करावी लागते. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये अनेक मोबाईल कंपन्यांची रेंज नसल्याने ही आकडेवारी वेळेत अद्ययावत करता येत नाही. याच आकडेवारीवर केंद्र आणि राज्य शासन निर्बंधाबाबत निर्णय घेत असल्याने ही आकडेवारी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे काही करून ही आकडेवारी अद्ययावत करा अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी केल्या आहेत. याच कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून रोज रात्री ८ वाजता प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हीसीव्दारे बैठक सुरू करण्यात आली आहे.