गणपती कोळी :
कुरुंदवाड:
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे शहराचा तिसरा डोळाच बंद असल्याने शहराची सुरक्षितता धोक्यात आली असून चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या विकासाच्या नावाखाली ईर्षेतून निधींची घोषणा करणाऱ्या नेत्यांनी किमान शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
शहरातील गुन्हेगारी, चोरी, नाहक गोंधळ घालून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्यांचा नेमका शोध घेता यावा व यातून शहराची सुरक्षितता ठेवता यावी, यासाठी पोलिसांच्या सूचनेनुसार शहरातील प्रमुख आणि संवेदनशील अशा अठरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलीस ठाण्यात करण्यात आले होते.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांचे गैरवर्तन करणाऱ्यांवर लक्ष असल्याने चोरीच्या अथवा गुन्हेगारांच्या घटनांना आळा बसला होता. मात्र २०१९ च्या प्रलयकारी महापुरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व त्याची दुरुस्तीच न झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत. सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी पोलिसांनी पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे चोरट्यांना फावले असून शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
राजकीय ईर्षेतून शहरातील सत्ताधारी-विरोधक गटनेत्यांनी आपापल्या नेत्यांकडून शहराच्या विकासासाठी निधी मंजूर झाल्याची घोषणा करत आहेत; मात्र प्रत्यक्षात किती निधी मिळाला, विकास किती झाला हा चिंतनाचा विषय आहे. शहरातील भूलभुलैया राजकारणावर शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त होत असून लोकप्रतिनिधी, नेत्यांनी किमान सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करुन शहराची सुरक्षितता ठेवावी, अशी मागणी होत आहे.
----------------------
चौकट - सीसीटीव्हीसाठी प्रयत्न गरजेचे
दोन दिवसांपूर्वी शहरातील भरवस्तीत आणि पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात घरफोडी करुन साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांना शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. या भागात पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत; मात्र सीसीटीव्ही यंत्रणाच बंद असल्याने चोरांचे फावले असून कॅमेरे सुरु असते तर चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असते. त्यामुळे पालिका प्रशासन आणि शहरातील लोकप्रतिनिधींनी आतातरी स्वत:चे डोळे उघडून पोलिसांचा तिसरा डोळा उघडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.