: चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी आजऱ्यातील बहुतांशी दुकानात व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात चोऱ्यांचे प्रमाण घटले आहे. परंतु बिलंदर चोरट्यांनी व्यापाऱ्यांचा हा तिसरा डोळा लंपास केला आहे. अशी चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी शहरातील २५ सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.
गुन्हेगारी व सुरक्षा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी व चोरट्यांच्या बारीक हालचाली टिपण्यासाठी आजरा शहरात २५ मोक्याच्या ठिकाणी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. मात्र त्याची वेळेवर दुरुस्ती न केल्यामुळे हे सीसीटीव्ही गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत. मात्र आजऱ्यातील बहुतांशी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमध्ये व दुकानाच्या बाहेर चोरीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र चोरट्यांनी दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे लंपास करून पोलिसांसह दुकानदारांसमोर तपासाचे आव्हान तयार केले आहे. दुकानदारांच्या सीसीटीव्हीमुळे आजरा शहरातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र गेल्या दोन दिवसात शहरातील लकमेश्वर इलेक्ट्रिकल्स, महाळसा ट्रेडर्स व कापड बाजार यासह अन्य दुकानांसमोरील सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे रात्री २ ते ४ या वेळेत चोरट्यांनी नियोजनबध्द उचकटून व कटरच्या सहाय्याने केबल तोडून लंपास केले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात फक्त चोरट्यांचे हात व निळा फुल की शर्ट दिसतो. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असते तर या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले असते. मात्र, हेच सीसीटीव्ही बंद आहेत. लोकसहभागातून बसविलेले आजरा शहरातील २५ सीसीटीव्ही कॅमेरे नगरपंचायत व पोलीस खात्याने तातडीने दुरुस्त करून सुरू करावेत, अशी मागणी शहरातील व्यापारी वर्गातून होत आहे.