कोल्हापूर : पोषण आहार अभियानाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या अभियानामध्ये तब्बल ७९ लाख विविध उपक्रम राबवीत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला.
पुणे जिल्ह्याने प्रथम, तर नाशिकने दुसरा क्रमांक मिळविला. महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर हे अभियान राबविण्यात आले.जिल्ह्यात १ ते ३० सप्टेंबरमध्ये या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र माजी राष्ट्रप्रती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे पहिले आठ दिवस राष्ट्रीय दुखवटा होता.
यानंतर सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस ताई, पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा व तालुका पोषण समन्वयक यांनी नियोजन करून विविध उपक्रम राबविले. जनजागरण करणारे वैविध्यपूर्ण संदेश आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचेही कौतुक करण्यात आले.लॉकडाऊनच्या काळातही ऑनलाईन पाककृती, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. केवळ पोषण आहाराचेच नव्हे तर आरोग्य, कोरोना या विषयांवरही मेसेज व्हॉटसॲपच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवले. ही संख्या ७९ लाख झाल्याने कोल्हापूरने राज्यात तिसरा, तर लोकसहभागामध्ये चौथा क्रमांक पटकावला. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.राज्यात पहिल्या पाचमध्ये प्रकल्पकोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, करवीर २, करवीर, कोल्हापूर ग्रामीण, पन्हाळा या बालविकास प्रकल्पांनी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले.
सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षका या सर्वांचे अभिनंदन करते. कोल्हापूर जिल्हा नेहमीच या विभागाच्या उपक्रमांसाठी ओळखला जातो. राज्यात तिसरा क्रमांक पटकावत ही ओळख पुन्हा एकदा ठळक झाली.-पद्माराणी पाटीलसभापती, महिला व बालकल्याणजिल्हा परिषद, कोल्हापूर.