कोल्हापूर : ज्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही लोकप्रतिनिधी आणि बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून शहरातील ओढ्या- नाल्यांचे मार्ग बदलले, पात्रे अरुंद केली, त्यांनाच ओढ्या-नाल्यांतील अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्यास सांगणे म्हणजे, मूळ हेतूला हरताळ फासण्यासारखे आहे. महानगरपालिकेला खरोखरच अतिक्रमणांचा शोध घावयाचा असेल, तर तो त्रयस्थ समिती अथवा संस्थेमार्फत घ्यावा, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते अजित ठाणेकर यांनी केली आहे.
महापुरानंतर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांनी शहरातील नाले व पूररेषेत झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. नगररचना विभागातील सगळे 'व्यवहार' सर्वश्रुत आहेतच. या विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि काही लोकप्रतिनिधी व बांधकाम व्यावसायिकांशी संगनमत करून यांनी केलेल्या नियमबाह्य रचनेमुळे कोल्हापूरचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शहरातील अनेक ओढे व नाले यांचे मार्ग बदलण्यासाठी याच विभागाने अनेक व्यावसायिकांना परवानगी दिली, हे उघड सत्य आहे, असे ठाणेकर यांनी म्हटले आहे.
शहरातील मध्यवस्ती असलेल्या ब्रम्हेश्वर बागेतून जाणारा नाला असो, की बसंत-बहार टॉकीजजवळील नाला असो, जयंती नदीतील अतिक्रमणे असोत, की गोमती नदीतील असोत, हे सगळे प्रकार नगररचना विभागाच्या दुर्लक्षामुळेच घडले आहेत किंबहुना नगररचना विभागाने नियमबाह्य परवाने दिले नसते, तर अशी बांधकामे होणे शक्यच नव्हते. म्हणूनच सर्वेक्षण नगररचना विभागाकडून करून न घेता त्रयस्थ समिती अथवा संस्थेकडून करून घ्यावे, अशी मागणी ठाणेकर यांनी केली आहे.