कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना ‘थर्ड जेंडर’ म्हणून मान्यता दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून, मानवी हक्कांचे जतन करणारा आहे. त्यामुळे आता सर्व शासकीय, अशासकीय आणि खासगी व्यवस्थापनांत ‘लिंग’ या शब्दासमोर स्त्री / पुरुष याबरोबरच ‘इतर’ हा पर्याय लिहिणे बंधनकारक आहे; पण या निर्णयाची अंमलबजावणी केवळ दोन-तीन टक्के आहे. कायद्याची मान्यता मिळाली तरी अजूनही तृतीयपंथीयांना माणूस म्हणून समाजमान्यता नाही आणि शासनाची मान्यताही नाही, अशी खंत ‘संवेदना’ मेळाव्यात अनेकांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय दिनानिमित्त अनगोळ फौंडेशन, आत्मसहाय्य सामाजिक संस्था, नवखुषी फौंडेशनतर्फे ‘संवेदना’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात रविवारी दुपारी हा मेळावा झाला. अनगोळ फौंडेशनच्या सचिव साधना झाडबुके म्हणाल्या, तृतीयपंथीयांमध्ये मातृत्वाची भावना दिसते; परंतु त्यांना कोणीही मूल दत्तक किंवा प्रतिपालकत्वासाठी देत नाहीत. कायद्यामध्ये तसा उल्लेख नाही. तृतीयपंथीयांना लग्न करावेसे वाटते; परंतु त्यांना कायद्याने तशी तरतूद नाही. ती मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे.
मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयूरी आळवेकर म्हणाल्या, शासनाच्या अनेक योजना केवळ स्त्री-पुरुषांसाठी असून, तेथेदेखील तृतीयपंथीयांचा विचार केला गेलेला नाही. सामाजिक न्यायाच्या अनेक योजना असल्या, तरी व सर्व दृष्टींनी तृतीयपंथी या योजनेस पात्र असले, तरी या तृतीयपंथीयांना अनुदान व पेन्शन मंजूर करताना त्यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये (स्त्री / पुरुष) घालायचे, हा प्रश्न अधिकाऱ्यांना असल्याने व ती संवेदनशीलता अधिकाऱ्यांत नसल्याने तृतीयपंथीय शासनाच्या सर्वच योजनांपासून वंचित राहतात. यासाठी शासनपातळीवर गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
याप्रसंगी प्रिया कुलकर्णी, स्मिता वदन, रोहिणी कांबळे, नवखुषी फौंडेशनच्या हुस्ना शेख यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नवखुषी फौंडेशनच्या अध्यक्ष वैशाली देसाई यांनी फौंडेशनच्या वतीने साडी वाटप केले. याप्रसंगी आत्मसहाय्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मनीषा जाधव यांनी प्रास्ताविक केले.आत्मसहाय्य सामाजिक संस्थेचे सचिव अशोक पोतनीस यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सदस्य उपस्थित होते.ओळखपत्र द्या...तृतीयपंथीयांना शासनाने ओळखपत्र देऊन त्यांचा विकास घडवून आणणे आवश्यक आहे. त्यांना आरोग्य, शिक्षण, मतदान, निवडणूक हक्क, वारसा हक्क, पालकत्वाचा हक्क व मूल दत्तक घेण्याचा हक्क, आदी अधिकार देण्याबाबत मागणी करून याबाबत यावेळी सविस्तर चर्चा केली. कोल्हापुरातील चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय दिनानिमित्त अनगोळ फौंडेशन, आत्मसहाय्य सामाजिक संस्था, नवखुषी फौंडेशनतर्फे आयोजित संवेदना मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना मयूरी आळवेकर. शेजारी वैशाली देसाई, मनीषा कापडे, साधना झाडबुके, प्रिया कुलकर्णी, स्मिता वदन उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)