कोल्हापूर : समाजाने झिडकारलेल्या तृतीयपंथीयांना सन्मान आणि स्थैर्य देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्र्ती सहकारी बँकेने तृतीयपंथीयांचे बचतगट स्थापन केले असल्याची माहिती अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे दिली. सामाजिक न्याय देण्यासाठी अशा प्रकारचे पाऊल उचलणारी जिल्हा बँक ही राज्यातील पहिली व एकमेव बँक असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात या बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात पासबुक वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, उदयानी साळुंखे, भय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, विलासराव गाताडे, पी. जी. शिंदे, प्रा. संजय मंडलिक, सर्जेराव पाटील-पेरीडकर, अनिल पाटील, राजू आवळे, संतोष पाटील, रणजित पाटील, आर. के. पोवार, ‘नाबार्ड’चे महाप्रबंधक नंदकुमार नाईक, अॅड. दिलशाद मुजावर, बॅँक निरीक्षक राजू लायकर, आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘समाजाने झिडकारलेल्या या घटकांना सन्मानाने जगता यावे यासाठी बँकेतर्फे बचतगटाच्या माध्यमातून अर्थसाहाय्य केले जाणार आहे. अशा बचतगटांना कमी व्याजाचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल; तसेच त्यांना विविध व्यवसाय व उद्योगांचे प्रशिक्षण देऊन घरबसल्या रोजगार उपलब्ध व्हावा व अर्थार्जन होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न राहणार आहे.
अॅड. दिलशाद मुजावर म्हणाल्या, जिल्ह्यामध्ये नोंदीत तृतीयपंथीयांची संख्या १८०० असून, इचलकरंजी शहरात ती २५० आहे. या सर्वांच्या स्थैर्यासाठी जिल्हा बॅँंकेच्या सहयोगातून प्रयत्न केले जातील. डॉ. ए. बी. माने यांनी प्रास्ताविक केले.या बचतगटांची उपस्थितीयावेळी इचलकरंजी शहरातील आदिमाया बचतगटाचे काशिनाथ डोणे व राखी गोरवाडे, दिलासा स्वयंसाहाय्यता बचत गटाचे कुमार पाटील व अनिल कोलप, जगदंबा बचत गटाच्या मस्तानी नगरकर व संजना जाधव, रेणुका बचत गटाचे संतोष महाजन व नितीन पोवार, धावती रेणुका महिला बचत गटाच्या प्रिया ऊर्फ भरत सवाईराम, सुनील उत्करे, साईनाथ बचत गटाचे अशोक सूर्यवंशी व इस्माईल शेख, आदींची उपस्थिती होती.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्र्ती सहकारी बॅँकेच्या कोल्हापुरातील मुख्य कार्यालयात गुुरुवारी अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तृतीयपंथीयांच्या बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात पासबुकांचे वितरण करण्यात आले. यावेळी संचालक निवेदिता माने, विलासराव गाताडे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, आदी उपस्थित होते.