कोल्हापूर : बालिंगा (ता.करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सवरील दरोड्यातील तिसरा संशयित अंबाजी शिवाजी सुळेकर (वय ४४, रा.पासार्डे, ता.करवीर) याला करवीर पोलिसांनी अटक केली. सुळेकर स्वत:हून शाहुपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. शाहुपुरी पोलिसांनी त्याचा ताबा करवीर पोलिसांकडे दिला असून, त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे ८ जूनला दुपारी दोनच्या सुमारास कात्यायनी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा पडला होता. सुमारे सव्वातीन कोटींचे दागिने घेऊन पसार झालेल्या सात संशयितांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते, तर चार परप्रांतीय दरोडेखोरांचा अद्याप शोध सुरू आहे. या गुन्ह्यातील तिसरा स्थानिक संशयित अंबाजी सुळेकर हा स्वत:हून शाहुपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर, शाहुपुरी पोलिसांनी त्याचा ताबा करवीर पोलिसांकडे दिला. करवीर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला मंगळवारपर्यंत (दि.२०) पोलिस कोठडी मिळाली.दरोड्याचे सूत्रधार सतीश पोहाळकर आणि विशाल वरेकर यांच्या सांगण्यावरून संशयित सुळेकर याने दरोड्यानंतर पळून जाण्यासाठी कार भाड्याने घेतली होती. परप्रांतीय दरोडेखोरांनी कात्यायनी ज्वेलर्समध्ये गोळीबार केल्याची माहिती मिळताच, सुळेकर गावातून निघून गेला होता. अखेर दहा दिवस भटकल्यानंतर पोलिसांकडून होणारी अटक टाळता येणार नसल्याची जाणीव होताच, सुळेकर स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला.देवदर्शन घेऊन शरण आलादरोड्याच्या गुन्ह्यानंतर घाबरून पळालेला सुळेकर मुंबई, पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट येथे लपला होता. देवदर्शन झाल्यानंतर स्वत:हून तो पोलिस ठाण्यात हजर राहिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.सुळेकर बनावट नोटातील आरोपीदीड वर्षापूर्वी सांगरुळ फाटा येथे पोलिसांना सापडलेल्या बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सुळेकरचा समावेश होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना त्याने बनावट क्रीडा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रेही तयार केल्याचे निष्पन्न झाले होते.
चौघे परप्रांतीय नेपाळच्या सीमेवर?दरोड्यातील चौघे परप्रांतीय नेपाळच्या सीमेवर गेल्याची माहिती तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर आहे. मात्र, अद्यापही त्यांना पकडण्यात यश आलेले नाही.