लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेत्त्वावर देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने फेरनिविदा काढली आहे. जिल्हा बँकेची ६७ कोटी ६७ लाख थकबाकी असून शनिवार (दि. १५) पासून निविदा भरता येणार आहे.
आजरा साखर कारखान्याकडील १०३ कोटी ७१ लाख ७८ हजार थकबाकीपोटी जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेतला आहे. कारखान्याची गाळप क्षमता २५०० टन असून हंगामात सरासरी गाळप पावणे चार लाख टन व्हायचे. बँकेने दोन वेळा भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी निविदा काढल्या होत्या. मागील निविदेमध्ये पुणे येथील ‘व्हिजन’ कंपनीने निविदा दाखल केली होती. एकच निविदा आली त्यात बयाणा रक्कम न भरल्याने निविदाच उघडली नाही. बँकेच्या ताब्यात कारखान्याची मालमत्तेसह साखरही जप्त केली होती. साखरेची विक्री करून त्यातून ३६ कोटी ४ लाख रुपयांची वसुली बँकेने केली आहे. त्यामुळे आता कारखान्याकडे ६७ कोटी ६७ लाख रुपये कर्ज आहे.
कारखान्यांचे दोन हंगाम वाया गेले आहेत. त्यामुळे आगामी हंगाम घेण्यासाठी जिल्हा बँकेने तयारी सुरू केली आहे. भाडे तत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी निविदा पत्त्द्धध्द केली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला न मिळाल्याने बँकेने तिसऱ्यांदा निविदा काढली आहे. शनिवारपासून निविदा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून २९ मे, दुपारी दोनपर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. निविदा फॉर्मची किंमत २० हजार रुपये असून एक कोटी बयाणा रक्कम आहे. ३१ मेे रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात निविदा उघडण्यात येणार आहेत.