ग्रामस्थांमधून नाराजी
मोहन सातपुते
उचगाव : शहराच्या आसपासच्या १४ गावांची तहान भागविणाऱ्या प्रादेशिक गांधीनगर नळपाणी योजनेचा बोजवारा उडाल्याने १४ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जीर्ण झालेल्या पाईप्समुळे या योजनेला वारंवार गळती लागत असल्याने संबंधित गावांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जीर्ण पाईप्सच्या जागी टाकलेल्या नव्या पाईपलाही वारंवार गळती लागत असल्याने ठेकेदाराच्या कामावरही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या योजनेतून वळिवडे, गांधीनगर, मुडशिंगी, उचगाव, उचगावपैकी मणेरमळा, शांतीनगर, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, नेर्ली-तामगाव, कणेरी दत्तनगर, मोरेवाडी, पाचगाव या गावांना पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो. ही योजना २००३-२००४ ला सुरू झाली. योजनेच्या सुरुवातीपासून पाणीपुरवठ्याविषयीच्या तक्रारी आहेत. या योजनेतील १४ गावे ही कोल्हापूर शहराजवळची असल्याने या गावांचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला एकाच योजनेवरून पाणीपुरवठा करण्याला मर्यादा येत आहेत. या योजनेला १८ वर्षे पूर्ण झाली तरी आजअखेर कोणत्याही गावाने पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरी कोणतीच नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित केलेली नाही. जीर्ण झालेल्या पाईपलाईनला गळती लागून पिण्याच्या पाण्याचा खोळंबा नित्याचा झाला आहे. सध्या ही योजना व्हेंटिलेटरवर असून, पाईपलाईनचे गॅप्स, व्हॉल्व्ह हे कळीचे मुद्दे बनले आहेत. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील कणेरीवाडी गावाजवळून जलशुद्धिकरण केंद्राकडे जाणारी ६०० मि.मी. व्यासाची गुरुत्ववाहिनी बदलण्यात आली. तरीही १४ गावांना बारमाही पिण्याचे पाणी देणाऱ्या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. विद्युत कनेक्शनच्या खेळखंडोबा आणि ४५० एम.एम. पाईपलाईनवर येणारे प्रेशर यामुळे पाईप्स वारंवार लिकेज होत आहेत. जुन्या-नव्या पाईपचा गॅप, जोड यामुळे पाईपलाईन फुटत आहेत. गेले दीड महिन्यात वारंवार होणाऱ्या लिकेजमुळे पाण्याची गळती होत आहे, तर गळती काढण्यासाठी पुन्हा खुदाई करणे, जोड बसविणे, पाणी उपसा करणे जिकिरीचे बनत आहे.
नव्या पाईपलाही गळती
या योजनेतील जीर्ण झालेल्या पाईप बदलून त्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात आल्या. पाणीटंचाई कार्यक्रम निधीतून अवघ्या दीड महिन्यापूर्वी या पाईप कार्यान्वित करण्यात आल्या. मात्र, नवीन जलवाहिनीला गळतीचे ग्रहण सुरू झाले आहे. या योजनेसाठी अकरा कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. जीवन प्राधिकरण अंतर्गत कामाचे टेंडर घेणाऱ्या औरंगाबादचे कॉन्ट्रॅक्टर बी. जे. सामृद्ध यांच्या कामाविषयीही नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वारंवार गळतीमुळे पाणीच मिळत नसेल तर पाणीपट्टी भरायची कशी असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
कोट : हे लिकेज हे समृद्ध कॉन्ट्रॅक्ट यांनी नवीन टाकलेल्या मुख्य ४५० मि.मी. डी. आय. पाईपला झालेले आहे. कागल येथे मुरगूड रोडपासून शाहू कारखाना ऑफिसजवळ फुटलेल्या पाईपलाईनचे लिकेज काढून झालेले नाही. यामुळे सर्वच १४ गावांचा पाणीपुरवठा बंद पडलेला आहे. हे लिकेज तातडीने काढून घेण्याची जबाबदारी या पाईपलाईनवर देखरेख करणारे अभियंता घेवडे यांची आहे.
कोट : ४५० एचपीच्या दोन मोटरद्वारे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होत असून, या पाण्याचा प्रचंड दाब निर्माण होतो. परंतु, वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे बॅक वॉटर परिणामातून मोठी कंप निर्माण होतात. यामुळे मुख्य जलवाहिनीवरती प्रचंड दाब निर्माण होऊन गळती लागत आहे.
ए. डी. चौगुले
शाखा अभियंता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
चौकट : जीवन प्राधिकरण योजनेतून येणारे पिण्याचे पाणी हे वारंवार कपात होत आहे. एक हजार लिटरला २० रुपये द्यावे लागतात. विद्युत बिल, कर्मचारी पगार यांचा ताळमेळ बसत नाही. या योजनेला १८ वर्षे झाली. त्यावेळची लोकसंख्या व आताची लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून निम्या गावाला पाणी आणि एमजीपीकडून निम्या गावाला पाणी घेतो; पण वास्तविक या योजनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या योजनेसाठी वार्षिक निधी दिल्यास त्याचा फायदा ग्रामस्थांना होईल.
महादेव पाटील
सरपंच, ग्रामपंचायत गोकुळ शिरगाव
चौकट : एमजीपीच्या पाण्याची कमतरता भासत राहते म्हणून गावाने स्वतंत्ररीत्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. बोअरवेलद्वारे पाणी गावाला मिळत असल्याने एमजीपीसारख्या योजनाही निष्क्रिय राहिल्या आहेत, गावची कोणतीही थकबाकी नाही.
उत्तम माने,
सरपंच
ग्रामपंचायत सरनोबतवाडी
चौकट :
पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची गाऱ्हाणी आहेत, पाण्याची स्वतंत्र योजना राबविणे अशक्य आहे. शासनाकडून निधी मिळाला तर उजळाईवाडीत स्वतंत्र पाणी योजना राबविणे शक्य आहे. वारंवार एमजीपीकडून होणाऱ्या पाण्याची टंचाई ही नित्याची बाब झाली आहे. लोक अडचणीत आहेत, थकबाकी असली तरी वसुली होणे गरजेचे आहे.
सुवर्णा माने,
सरपंच
ग्रामपंचायत उजळाईवाडी
चौकट:
एमजीपीच्या ऑफिसला सोमवारी भेट देऊन या योजनेच्या कामाचे अडथळे लक्षात घेतले आणि त्यातून मार्ग काढणार असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले. वारंवार व्हॉल्व लिकेज होत आहेत आणि त्यातून पाण्याची गळती होते. त्यामुळे व्हॉल्व बदलणे गरजेचे आहे.
दीपक रेडेकर,
शिवसेना शाखाप्रमुख, उचगाव
फोटो : १४ नळपाणीपुरवठा योजना
ओळ
प्रादेशिक गांधीनगर नळपाणी योजनेला नव्याने टाकलेल्या पाईपलाईनला गळती लागून पाणी वाया जात आहे. २) प्रादेशिक गांधीनगर नळपाणी योजना कार्यान्वित झालेले ठिकाण.