इंदुमती गणेश ।कोल्हापूर : राज्य शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाकडे बजेटच नसल्याने राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे जुलैपासूनचे मानधन थकले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी सोमवारपासून (दि. ३) आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रत्येक शहराच्या भागाभागांत काम करणाºया अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांवर शासनाच्यावतीने अनेक जबाबदारीची कामे सोपविली जातात. गरोदर मातांपासून ते सहा वर्षांच्या मुलांपर्यंतच्या सगळ्या नोंदी, लसीकरण, विविध कार्यक्रम घेणे, शाालेय पोषण आहार, अशी कामे करणाºया अंगणवाडी सेविकांना शासनाकडून सात हजार रुपये व मदतनिसांना तीन हजार आठशे रुपये मानधन दिले जाते.
गतवर्षीपासून त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. मात्र, तेव्हापासून मानधन जमा होण्यातील घोळही वाढले आहेत. आता तर आॅगस्ट महिना संपला तरी त्यांचे जुलै महिन्याचे मानधन खात्यावर जमा झालेले नाही. याबद्दल कृती समितीच्या पदाधिकाºयांनी वारंवार शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी बजेट आलेले नसल्याचे कारण सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर संक्रांत आली आहे. परिणामी, आर्थिक अडचणींना त्यांना सामोरे लागत आहे.
अखेर आता या अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, सोमवारपासून त्या खाऊ वाटपाखेरीज कोणतेही काम करणार नाहीत किंवा अहवाल सादर करणार नाहीत, असे जाहीर केले आहे.आॅनलाईनने वाढविला घोळ, आठ महिने मानधन नाहीशासनाने गतवर्षीपासून अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम थेट खात्यावर भरण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी महिलांना बँकेला आधार नंबर लिंक करावा लागतो. काही सेविकांचे आधार नंबर अजून बँकेला लिंक झालेले नाहीत, काहीजणांचे आधार लिंक होऊनही खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. अशा प्रकारे राज्यातील जवळपास १२०० व कोल्हापूर जिल्ह्यातील २६ महिलांना जानेवारीपासून गेल्या आठ महिन्यांचे मानधनच मिळालेले नाही.जुलै महिन्यात शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार २५ पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करण्यात येणार आहेत. तेथील अंगणवाडी सेविका व मदतनिसांना अन्य रिक्त पदांवर सामावून घेण्यात येणार आहे.
मी आॅक्टोबरमध्ये बँकेला आधार कार्ड लिंक केले. नोव्हेंबर, डिसेंबरचे मानधन खात्यावर जमा झाले; पण त्यानंतर खात्यावर मानधनच जमा झालेले नाही. तीन महिन्यांपूर्वी पुन्हा आधार लिंकचा अर्ज दिला. दरवेळी बँकेत गेले की चार दिवसांत मिळेल. खात्यावर जमा केलंय, असे सांगितले जाते; पण अजून मला आठ महिन्यांचे मानधनच मिळालेले नाही. घर चालवणं अवघड झालंय.- प्रेमला मगदूम, अंगणवाडी मदतनीस, शााहूवाडी.अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मिळणारे मानधनच मुळात कमी आहे. त्यात आठ महिन्यांपासून पैसै मिळत नाहीत. अधिकारी बजेट नसल्याचे उत्तर देतात. त्यामुळे आता सर्वांनी अनियमित संघर्षाची भूमिका घेतली आहे.- सुवर्णा तळेकर, जनरल सेक्रेटरी, कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ.