कोल्हापूर - सत्तेवर येण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी वारेमाप घोषणा केल्या. परंतू राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. लाडक्या बहिणींना २१०० रूपये सोडा १५०० रूपयेही मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही. हे सरकार घर विकून दिवाळी साजरे करणारे आहे अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केली.
शनिवारी सकाळी ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, घोषणांचा पाऊस सुरू आहे. परंतू प्रत्यक्षात फार काही होताना दिसत नाही. नाही म्हणायला रस्ते विकासकामध्ये थोडे काम दिसते. राज्यावर सात लाख कोटी रूपयांचे कर्ज आहे. जन्माला येणारे प्रत्येक मूल डोक्यावर कर्ज घेवून येत आहे. आणखी वर्षभराने शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही याची शंका आहे.
जगताप म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेगवेगळ्या सुरात बोलत आहेत. हे बेसूर चित्र आता समोर आले आहे. शिंदे तर आपण अजून मुख्यमंत्री असल्याच्या आविर्भावातच असतात. हिंदी विषयाच्या सक्तीने मराठीवर परिणाम होईल असे वाटत नाही. मुंबई महापालिका कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढवावी हे माझे पहिल्यापासून मत आहे. नितीन गडकरी यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतू कित्येक वर्षे झाली तरी त्यांना मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करता आलेला नाही. दळणवळण प्रभावी असेल तर विकास होतो हे वास्तव आहे. परंतू तरीही स्थानिक लोकभावना विचारात घेवूनच निर्णय व्हावा असेही जगताप म्हणाले.