जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत चाललयं, असं हे सरकार; आमदार प्रकाश आवाडे यांची खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 03:52 PM2022-04-01T15:52:27+5:302022-04-01T15:56:57+5:30
राज्यातील २५ आमदार सध्या नाराज आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. म्हणजे सन २०२४ पर्यंत काँग्रेसमध्ये कितीजण राहतील, हे पहा.
इचलकरंजी : सध्या राज्यात चाललेले महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत चाललयं, अशी स्थिती आहे. त्यामुळे मंत्रीसुद्धा आज मी मंत्री आहे, आजचे कार्यक्रम करायचे, एवढ्यावरच त्यांचसुद्धा चाललयं, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी केली.
एका बँकेच्या आर्थिक वर्षाचा आढावा घेताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आवाडे म्हणाले, राज्यातील २५ आमदार सध्या नाराज आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार पी. एन. पाटील आणि राजूबाबा आवळे यांचा समावेश आहे. म्हणजे सन २०२४ पर्यंत काँग्रेसमध्ये कितीजण राहतील, हे पहा.
मी केलेल्या भाषणातील बोलण्याचा विपर्यास करून मुद्दाम प्रसारीत करण्यात आले. ज्यावेळी काँग्रेसचेच सरकार देशात बहुमतात होते, त्यावेळी काश्मीरमधील ३७० कलम हटवले गेले नाही, ते काम मोदी सरकारने केले. देशप्रेमापोटी बोललेले हे वक्तव्य काहीजणांना रूचले नाही.
मीही काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी आम्ही बघितलेले काँग्रेसचे नेते त्या उंचीचे होते. राज्यातही अनेक दूरदृष्टीचे नेते बघितले, परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे. याचे उत्तर आता ‘उत्तर’ मध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर लक्षात येईल. भविष्यातही सर्वत्र भाजपच असेल, असेही आवाडे यांनी स्पष्ट केले.