'धीस इज धंगेकर' कोल्हापुरात झळकले बॅनर, कसब्याच्या निकालातही मंत्री चंद्रकांत पाटील पडले तोंडघशी
By विश्वास पाटील | Published: March 4, 2023 01:57 PM2023-03-04T13:57:01+5:302023-03-04T14:06:57+5:30
कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत मंत्री पाटील यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याचे चॅलेंज जोरदार गाजले होते
कोल्हापूर : आपल्या वादग्रस्त विधानाने कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत पराभव ओढवून घेतलेले भाजपचे नेते उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही तोंडघशी पडले. तिथे मंत्री पाटील यांनी 'व्हू इज धंगेकर' अशी विचारणा मतदारांना केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
मात्र निकालानंतर काँग्रेस समर्थकांनी धीस इज धंगेकर This is Dhangekar असे प्रत्युत्तर देत पाटील यांनी ट्रोल केले. याचे लोण कोल्हापुरातही पाहायला मिळाले. अन् आता थेट धीस इज धंगेकर This is Dhangekar चे बॅनर झळकले. शहरातील कावळा नाका चौक परिसरात महाविकास आघाडीकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
गतवर्षी एप्रिलमध्ये झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत मंत्री पाटील यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याचे चॅलेंज जोरदार गाजले होते. मतदारांनी पैसे घेतल्यास त्यांची ईडीकडून चौकशी करणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यांचे प्रत्येक विधान वादग्रस्त बनले व त्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली.
कसबा पेठमधील एका सभेतही त्यांनी असेच चॅलेंज केले होते. विरोधी उमेदवाराची लायकी काढणारे हे चॅलेंज होते. ते त्यांना चांगलेच महागात पडले. त्यामध्ये ते म्हणतात, गेली दहा-बारा दिवस प्रचारात मी वारंवार ऐकतोय की धंगेकर विरुद्ध रासणे. व्हू इज धंगेकर..? त्याला निकालानंतर धंगेकर यांच्या जल्लोषानेच पुणेकरांनी प्रत्युतर दिले. पब्लिकची डिमांड ती... तो भाऊ को आना पडा... साऱ्या पुण्यात इतिहास घडला... पायरी यशाची एकेक चढला... विरोधकांचा धुरळा उडला... बघा कार्याचा प्रकाश पडला... आला आला रवींद्र धंगेकर आला... हे आला जयराम आला...च्या चालीवरील गाणे जोरदार व्हायरल झाले. आता कळलं का... व्हू इज धंगेकर... फक्त घाम नाही... बालेकिल्ला फोडलाय... कसबा तो एक झाकी है... कोथरूड अभी बाकी है... चंद्रकांत हटावो... बीजीपी बचाओ, अशाही मीम्स पुण्यात जोरदार व्हायरल झाल्या.
कसबा पेठेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ११ हजार ४०० मतांनी विजयी झाले. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्याच जयश्री जाधव १९ हजार ३०७ मतांनी विजयी झाल्या. साम, दाम, दंड, जाती-धर्माचे राजकारण, पोलिस खात्याचा वापर ही सगळी ताकद लावूनही कोल्हापूर पाठोपाठ पुणेकरांनी भाजपला पराभूत केले.