कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा घोडा होण्याचा मान मिळण्यासाठी घोड्यालाही परीक्षा द्यावी लागणार आहे. देवाला घोडा देण्यासाठी १४ जणांनी देवस्थान समितीकडे अर्ज दिला आहे, त्यापैकी १६ लक्षणी असलेल्या घोड्यालाच देवाचा घोडा म्हणून मान मिळणार आहे. त्यानंतरही त्याचे प्रशिक्षण घेतले जाते.जोतिबा देवाच्या पालखी सोहळ्यासह सर्व धार्मिक विधींमध्ये घोड्याला विशेष स्थान आहे. त्या घोड्यावर देव बसतो, त्यामुळेच तो कायमच रिकामा असतो, पण काही दिवसांपूर्वी देवाच्या उन्मेष घोड्याचे निधन झाले. चैत्र महिन्यात जोतिबाची यात्रा असल्याने यात्रेच्या आधी नवा घोडा घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने शोधमोहीम सुरू केली आहे. आपला घोडा देवाच्या सेवेत रुजू व्हावा, यासाठी समितीकडे तब्बल १४ जणांनी घोडा देणगी म्हणून देण्यासाठी अर्ज दिले आहेत. त्यापैकी एका घोड्याची देवाचा घोडा म्हणून निवड केली जाणार आहे. सध्या आठ घोडे बघून पूर्ण झाले आहेत.१६ लक्षणी असावा घोडादेवाचा घोडा होणे हे एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही. धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद केल्यानुसार, हा घोडा १६ लक्षणी असावा, या १६ अटी, निकषात बसणाऱ्या घोड्यालाच देवाच्या सेवेत घेतले जाते. या घाेड्याचा शोध सुरू झाला असून, एक घोडा पसंतीस उतरला आहे, पण उरलेले घोडे बघितल्यानंतर, त्यापैकी सर्वोत्तम घोड्याला हा मान मिळणार आहे.
या आहेत अटी- घोडा आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त असावा.- घोड्याच्या चेहऱ्यापासून पायापर्यंत कोठेही डाग नसावा.- घोडा पांढरा असावा.- अंगावरचे केस ताठ उभे असावेत.- डोळ्यातून अश्रुधारा येऊ नयेत.- घोड्यावर यापूर्वी कोणीही बसलेले नसावे.- पायावर-शरीरावर भोवरा नको.- कंठी दिसू नये. (यासह आणखी ८ अटी आहेत.)
दागिने, गर्दी अन् तोफेची सवय
कोणता घोडा देवाच्या सेवेत घ्यायचा, हे ठरले की त्याचे प्रशिक्षण सुरू होते. घोड्याच्या अंगावर जवळपास ५ किलो चांदीचे दागिने, तसेच देवाची गादी, वस्त्र पांघरले जाते. हे दागिने व वस्त्रांसह वापरण्याची सवय लावावी लागते. त्याचा गर्दीच्या वेळी आणि तोफ उडाली की घोडा बिथरू नये, यासाठी त्याला माणसांमध्ये मिसळण्याची, तसेच तोफेचा आवाज ऐकण्याची सवय लावली जाते. या सगळ्यासाठी किमान महिना जातो.
घोड्यासाठी सेवा द्या...आपला घोडा देवाच्या सेवेत असावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, पण एकाच घोड्याची निवड केली जात असल्याने, देवस्थान समितीने अन्य मालकांना देवाच्या घोड्यासाठी सेवा द्या, असा प्रस्ताव ठेवला आहे. वर्षभराचे खाद्य, व्यायाम करून घेण्यासाठी रिंगण, घोड्याचा तबेला, खुराक, देवाची गादी अशी सेवा देता येईल.