मोठ्या पक्षाची जाहीर उमेदवारी मागे घेण्याची पहिलीच घटना, काँग्रेसला धक्का; सतेज पाटील यांची डोकेदुखी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 01:37 PM2024-11-05T13:37:15+5:302024-11-05T13:37:42+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर एखाद्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेच चक्क माघार घेण्याची जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना सोमवारी अर्ज ...
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर एखाद्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेच चक्क माघार घेण्याची जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी घडली. कोल्हापूर उत्तरमधीलकाँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात झालेल्या घडामोडींनंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीसह काँग्रेसलाही मोठा धक्का बसला.
कोल्हापूर उत्तरमधील घडामोडी या सुरुवातीपासूनच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यासाठी डोकेदुखी ठरल्या. लोकसभेला त्यांनी शाहू छत्रपती यांना रिंगणात उतरवून त्यांच्यासाठी सगळी यंत्रणा राबवली व तब्बल २५ वर्षांनंतर हात चिन्हांवर काँग्रेसचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आणला. तेव्हापासून कोल्हापूर उत्तरचा उमेदवार कोण? ही उत्सुकता लागून राहिली होती.
शाहू छत्रपती यांच्या प्रचारात पुढे असलेल्या मधुरिमाराजे यांचेच नांव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते; परंतु एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी हे कोल्हापूरला किती रुचेल, असा विचार झाल्याने छत्रपती घराण्यातूनच त्यांच्या उमेदवारीला परवानगी मिळाली नाही. एकदा त्या तयार नाहीत म्हटल्यावर काँग्रेसचे पर्याय मर्यादित झाले.
पक्षाकडे वसंत मुळीक, राजू लाटकर, शारंगधर देशमुख, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, आनंद माने, दुर्वास कदम, आर. डी. पाटील यांनी मुलाखती दिल्या. त्यात मुळीक नव्या पिढीला कितपत चालतील, असा विचार झाल्याने त्यांचे नाव मागे पडले. माने, आर. डी. यांच्या स्वत:च्या मर्यादा होत्या. शारंगधर देशमुख हे मूळचे सांगली जिल्ह्यातील असल्याने कोल्हापूर कितपत स्वीकारेल, असा विचार झाला. सचिन चव्हाण हे मूळचे पेठेतील असल्याने त्यांचे नाव पुढे होते; परंतु महापालिकेच्या कुरघोडीच्या राजकारणातून ते नाव मागे पडले.
असूयाही कारणीभूत..
उपलब्ध पर्यायातून पक्षाने राजू लाटकर यांना उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी जाहीर होताच काहींची मजल काँग्रेस समितीवर दगडफेक करण्यापर्यंत गेली. काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी लाटकर नकोत, अशी मोहीमच उघडली. त्यासाठी सह्यांची मोहीमही राबविली. आपल्याबरोबरीचा कार्यकर्ता पुढे जातो, अशी असूयाही त्यामागे होती.
छत्रपती घराण्याकडे आग्रह
सर्व असंतुष्टांनी छत्रपती घराण्याकडे आग्रह धरला आणि मधुरिमाराजे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी तयार केले. कार्यकर्त्यांच्या दबावापोटी आम्ही रिंगणात उतरत असल्याचे जाहीर केले आणि शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला.
कौटुंबिक दबावातून माघारीची नामुष्की..
अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी धडाक्यात प्रचार सुरू केला. वृत्तपत्रांना भेटी दिल्या. अंबाबाई, भवानीमातेचे जाऊन दर्शन घेतले. गेली पाच दिवस त्या पायाला भिंगरी लावून त्यांच्या स्टाइलने प्रचारात उतरल्या होत्या; परंतु सोमवारी या सगळ्याच घडामोडींना धक्कादायकरीत्या ब्रेक लागला आणि पक्षांकडून उमेदवारी मिळाली असतानाही कौटुंबिक दबावातून अर्ज मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली.