- अनिल पाटील सरुड : एक रकमी एफ आर पी हा शेतकर्यांचा न्याय हक्क आहे . त्यामुळे येत्या गळीत हंगामात साखर कारखानदारांच्या मानगुटीवर बसुन एकरकमी एफ आर पी तर घेणारच शिवाय काटा मारून शेतकऱ्यांच्यावर दरोडा टाकणार्या साखर कारखानदारांचा यावर्षी काटा काढल्याशिवायही राहणार नाही असा इशारा माजी खा . राजू शेट्टी यांनी सरुड येथील सभेत दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एकर कमी एफ आर पी जागर यात्रेस सरुड येथून प्रारंभ झाला . यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले , महाविकास आघाडीच्या सरकारने बेकायदेशीररित्या एफ आर पी चे तुकडे पाडले . परंतू आम्ही शेतकर्यांना एकरकमी एफ आर पी मिळवुन दिल्या शिवाय गप्प बसणार नाही . तसेच गेल्यावर्षीचे एफ आर पी पेक्षा जास्तीचे दोनशे रु ही साखर कारखानदारांना सोडणार नाही . गेल्या चार वर्षात खते , तणनाशके , मशागतीचे दर दुप्पटीने वाढले परंतू ऊस दरामध्ये मात्र त्या पटीने वाढ झाली नाही . उत्पादन खर्चापेक्षा ऊसाला जास्त दर मिळाला नाही तर शेतीव्यवसाय फायद्यात येईल का ? असा सवालही शेट्टी यांनी यावेळी केला . साखर निर्यातीमुळे तसेच उपपदार्थ निर्मितीमुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत . त्यामुळे यापुढे आपल्या घामाचा योग्य दाम मिळविण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा.
यावेळी भाई भारत पाटील , संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पवार , अमर पाटील ( साळशी ) मानसिंग पाटील ( सागाव) यांची भाषणे झाली. या सभेस स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष वसंत पाटील , रायसिंग पाटील , जयसिंग पाटील ( चरण ) , पद्मसिंह पाटील , शामराव सोमोशी - पाटील भिमराव नांगरे - पाटील , जयवंत नांगरे - पाटील काका पाटील ( सरुड ) , रामभाऊ लाड , भैय्या थोरात , अजित साळुंखे आदीसह सरुड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्तविक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर यांनी केले . सुत्रसंचालन प्रशांत मिरजकर यानी तर आभार अवधुत जानकर यांनी मानले.