जोतिबा : तब्बल दोन वर्षानंतर श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील यंदाची चैत्र पौर्णिमा यात्रा कोणत्याही निर्बंधाशिवाय होणार आहे. त्यामुळे भाविकांना यंदा चांगभलंच्या गजरात गुलाल, खोबऱ्याची उधळण करता येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित चैत्र यात्रा नियोजन आढावा बैठकीत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही घोषणा केली. यामुळे यावर्षीची चैत्र पौर्णिमेची यात्रा होणार की नाही हा भाविकांचा आणि ग्रामस्थांचा संभ्रम दूर झाला. त्यामुळे यंदाच्या यात्रेत जोतिबाचा डोंगर पुन्हा भाविकांनी फुलणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यंदाही यात्रा होणार की नाही याबाबत भाविक आणि ग्रामस्थांमध्ये संभ्रम होता. मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने प्रशासनाने यावर्षी चैत्र यात्रेवरील सर्व निर्बध हटवले. परंतू यात्रेत सहभागी होणारे व्यापारी, जिल्हा प्रशासनाचे प्रत्येक विभाग प्रमुख आणि सर्व परवाना धारक घटकांना कोव्हीड लसिकरणाचे दोन डोस बंधनकारक राहणार आहे. पण दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व नियम शिथिल असतील.या आढावा बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांच्या तयारीचा आणि नियोजनाचा आढावा घेतला. यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक जोतिबा डोंगरावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजनात कसलीही कमतरता आणि त्रुटी राहू नये, अशी सूचना जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक विभागाला दिली.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जोतिबा ग्रामपंचायत, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, एसटी महामंडळ आणि सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा दिला. शाहूवाडी उपविभागीय अधिकारी अमित माळी, पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, देवस्थान समितीचे प्रभारी सचिव शिवराज नायकवडी, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, देवस्थान समिती इनचार्ज दिपक म्हेत्तर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, पुजारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
चांगभलं! यंदा जोतिबाची चैत्र यात्रा दणक्यात, निर्बंध हटले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 7:10 PM