कोल्हापूर : श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथील तृतीयपंथी समाजसेवी संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांना यंदाचा येथील ‘कुसुम’ पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. मुक्त सैनिक वसाहतीतील वालावलकर माध्यमिक शाळेमध्ये शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या समारंभात त्यांना हा ५१ हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत पाटगांवकर यांच्या निधनानंतर त्यांच्या शिल्लक रकमेच्या व्याजातून हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते आणि आंतरभारती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
लेस्बियन, गे, बायोसेक्शुअल ट्रांसजेंडर समुहाच्या प्रतिनिधी, कवयित्री, स्तंभलेखिका, महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्सजेंडर प्रदेश प्रवक्ता अशा विविध भूमिकांमधून दिशा पिंकी शेख कार्यरत आहेत. आंतरभारती शिक्षण मंडळाच्या पल्लवी कोरगावकर, सुचिता पडळकर, तनुजा शिपूरकर, विनय पाडगावकर यांच्या समितीने ही निवड केली.
यापूर्वी डॉ. कविता सातव, मुमताज शेख, कांचन परुळेकर, मेधा पुरव - सामंत, सुनिती सु. र. डॉ. सुचेता धामणे व डॉ. अर्पणा देशमुख यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वेगळ्या वाटेने जाऊन समाजाच्या भल्यासाठी आयुष्यातील कित्येक वर्षे खर्ची घालणाऱ्या महिलेस हा पुरस्कार देऊन त्या महिलेच्या कामाला बळ देण्याचा प्रयत्न या पुरस्काराच्या निमित्ताने आजपर्यंत संयोजकांनी केला आहे.