कोल्हापूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम-२०१६ मध्ये अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी आणि नवे शैक्षणिक धोरण-२०२०च्या अनुषंगाने करावयाच्या सुधारणांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे. ही समिती सोमवारी विद्यापीठात विद्यार्थी संघटनांशी संवाद साधणार आहे.
या समितीमधील महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा मूल्यमापन समिती या उपसमितीची सभा सोमवारी (दि. १४) व मंगळवारी (दि. १५) शिवाजी विद्यापीठात होत आहे. या अनुषंगाने सोमवारी दुपारी १२.१५ ते १.०० या वेळेत ही थोरात समिती राजर्षी शाहू सभागृहात विद्यापीठाशी निगडित विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहे.
ज्या विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींना उपस्थित राहावयाचे असल्यास संबंधित संघटनेच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींना सभेस उपस्थित राहता येईल. तत्पूर्वी, संबंधित संघटनेस महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने काही सूचना असल्यास त्या meeting@unishivaji.ac.in या ई-मेल आयडीवर पाठवून द्याव्यात. तसेच या सूचना लिखित स्वरूपात बैठकीवेळी सभागृहामध्ये समितीकडे सादर कराव्यात.