मुरगूड : कुस्तीशौकिनांनी खचाखच भरलेल्या मैदानात रात्री सव्वा दहा वाजता सुरू झालेल्या अंतिम लढतीत ‘महाराष्ट्र केसरी’मध्ये लढलेला गंगावेशचा माउली जमदाडेला सोलापूरच्या नवखा परंतु चपळ असणाऱ्या हर्षवर्धन थोरातने गुणांवर हरवत लाल आखाडा चषकावर नाव कोरले.
हर्षवर्धन थोरातला लाल आखाडा चषक व बुलेट देऊन सन्मानित करण्यात आले तर उपविजेता माउली जमदाडेला होंडा मोटारसायकल गाडी देऊन सन्मानित करण्यात आले तर ५७ किलो वजनीगटातील शहाजी कुमार चषकासाठी झालेल्या कुस्तीत सोनगे (ता. कागल) येथील पण सेनादल येथे सराव करत असलेला आंतरराष्ट्रीय मल्ल भरत पाटील याने ‘महाराष्ट्र चॅम्पियन’ बानगे येथील संतोष हिरुगडे याला पराभूत करत विजेतेपद पटकावले.
मुरगूड (ता. कागल) येथे कोल्हापूर जिल्हा व शहर तालीम संघाच्या मान्यतेने आणि लाल आखाडा व्यायाम मंडळ यांच्यावतीने आयोजित केलेल्या लाल आखाडा चषक मॅटवरील राज्यस्तरीय भव्य कुस्ती स्पर्धेत बुधवारी सर्वच गटांतील अंतिम लढती तुल्यबळ झाल्या. गोकुळ दूध संघाचे संचालक रणजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले होते. यावेळी रणजितसिंह पाटील यांचा ६१ व्या वाढदिवसानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांच्याहस्ते नागरी सत्कार करण्यात आला.खुल्या गटातील तृतीय क्रमांक संतोष लवटे याला २५ हजार तर चतुर्थ क्रमांकासाठी लव्हाजी साळोखे याला १५ हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
विजेत्यांना खासदार धनंजय महाडिक, अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वजित पाटील, पद्मसिंह पाटील आदींच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी दीनानाथ सिंह, अरुण नरके, रणजितसिंह पाटील, धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत दगडू शेणवी तर प्रास्ताविक संतोषकुमार वंडकर यांनी केले. यावेळी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हिंदकेसरी दीनानाथसिंह, ‘शाहू साखर’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ‘गोकुळ’चे संचालक धैर्यशील देसाई, विलास कांबळे, विश्वास जाधव, दिनकरराव कांबळे, चंद्रकांत चव्हाण, ‘बिद्री’चे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, दत्तामामा खराडे, चेतन नरके, बाबासाहेब पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, विजयसिंह मोरे, रवींद्र पाटील, रणजित नलावडे, विश्वजित पाटील, पद्मसिंह पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. आभार भरत लाड यांनी मानले.मुरगूड येथील लाल आखाडा व्यायाम मंडळाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटातील सोलापूरच्या हर्षवर्धन थोरात, माउली जमदाडे यांना बक्षीस देताना खासदार धनंजय महाडिक, अरुण नरके, रणजितसिंह पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, विश्वजीत पाटील, संतोष वंडकर, दगडू शेणवी आदी.