मुरलीधर कुलकर्णी ---कोल्हापूर -त्याचं वय आहे अवघं पाच वर्षांचं. पण त्यानं अन् त्याच्या आई-वडिलांनीही अचाट इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरसारख्या असाध्य रोगाचे आक्रमण अक्षरश: परतवून लावलंय. पीएनईटी (प्रिमीटिव्ह न्यूरोएक्टोडर्मल ट्युमर) नावाच्या एका दुर्मीळातल्या दुर्मीळ कॅन्सरशी परिस्थिती नसतानाही त्यांनी गेल्या अडीच वर्षांपासून दिलेला लढा खरोखरच कौतुकास्पद आहे.या काळात या चिमुकल्यानं २५ रेडिएशन थेरपी, ३२ केमोथेरपी आणि बरगडी काढण्याच्या दोन शस्त्रक्रिया सहन केल्या आहेत. उपचार सुरू करण्यापूर्वी तापानं सतत आजारी असणारा तो आता दोन किलोमीटर सायकल चालवतोय अन् त्याच्या छातीतील दुखणंही आता संपलंय. कुणालाही विचार करायला लावणारी ही कहाणी आहे बलराम कॉलनी सुतारमाळ, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर येथे राहणाऱ्या राजवीर गोरखनाथ पाटील या चिमुकल्याची. तो अडीच वर्षांचा असताना त्याला न्यूमोनियाची लक्षणं दिसली. म्हणून कोल्हापुरातल्या एका हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं. छातीत मोठ्या प्रमाणात कफ झालेला असल्याने त्याचं आॅपरेशन करावं लागेल, असे डॉक्टरांनी सांगितलं. ही शस्त्रक्रिया करत असताना डॉक्टरांना त्याच्या हृदयावर आणि फुप्फुसावर काही गाठी असल्याचं आढळलं अन् डॉक्टरांच्या मनात एका वेगळ्याच शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी बोयोप्सी टेस्ट करायचा सल्ला दिला. या टेस्टचे रिपोर्ट येताच राजवीरच्या आई-वडिलांच्या पायाखालची अक्षरश: वाळूच सरकली. कारण ‘पीएनईटी’ नावाच्या दुर्मीळ कॅन्सरचे निदान डॉक्टरांनी केलं होतं.पण राजवीरची आई शुभांगी आणि वडील गोरखनाथ यांनी एक गोष्ट मनाशी पक्की ठरवली. काहीही झालं तरी पोराला वाचवायचच. इतक्या लहान मुलावर कॅन्सरचे उपचार करायला कोल्हापुरातले कोणीही डॉक्टर तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले.सुप्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ. रश्मी गुडूर यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. सिटी स्कॅनमध्ये त्याच्या दोन बरगड्यांनाही कॅन्सरच्या गाठी असल्याचं आढळलं. तेव्हा डॉक्टरांनी मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये दाखविण्याचा त्यांना सल्ला दिला. तिथे शस्त्रक्रियेने त्याच्या दोन बरगड्या काढण्यात आल्या. गेल्या अडीच वर्षांपासून त्याच्यावर कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी व रेडिएशनचे उपचार सुरू आहेत. या उपचारांनी त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झालीय. नुकत्याच केलेल्या स्कॅनिंगमध्ये तर त्याच्या छातीतील कॅन्सर जवळपास ९० टक्के बरा झाला असल्याचे जेंव्हा दिसून आले तेव्हा तर राजवीरच्या आई-वडिलांंसह त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्याही आनंदाला सीमा उरली नाही. पण, अजूनही लढाई संपलेली नाही. उरलेल्या दहा टक्के कॅन्सरलाही संपविल्याशिवाय पाटील दाम्पत्य स्वस्थ बसणार नाही. यासाठी समाजातल्या दानशूरांनी त्यांना मदत करण्याची गरज आहे.उपचारासाठी राहतं घर विकलंमुलाच्या कॅन्सरवरच्या उपचारासाठी राजवीरचे वडील गोरखनाथ पाटील यांनी राहतं घर विकलं. आईने अंगावरचे दागिने विकले पण उपचारात कुठेही खंड पडू दिला नाही. पण, इतकं करूनही पैसे पुरेनात. तेव्हा मात्र समाजाकडे मदतीसाठी याचना करण्याशिवाय त्यांना कुठलाही उपाय राहिला नाही. समाजातल्या अनेक संस्थांनी, तरुण मंडळांनी आणि दानशूर लोकांनी केलेल्या मदतीवरच राजवीरला आतापर्यंत चांगले उपचार मिळाले असून, निदान झाल्यापासून आजपर्यंत जवळपास १0 ते १२ लाख रुपयांचा खर्च त्याच्या उपचारांसाठी झालेला आहे.पीएनईटी (प्रिमीटिव्ह न्यूरोएक्टोडर्मल ट्युमर) हा अत्यंत घातक व दुर्मीळ कॅन्सर लाखात एखाद्या मुलामध्ये आढळतो. लवकर निदान केल्यास व उपचारात सातत्य राखल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. राजवीरला कॅन्सरचे निदान झाले त्यावेळचे त्याचे रिपोर्ट व आताचे रिपोर्ट यात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे.- डॉ. आर. एस. पाटील, एम.डी.सहयोगी प्राध्यापक, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज
त्या चिमुकल्यानं हरवलंय कॅन्सरला...
By admin | Published: February 27, 2017 11:58 PM