आंबा/कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील लोळाणे येथील करुंगळे रस्त्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेतकरी जखमी झाले. यावेळी त्या तीन पठ्यांनी या अडीच वर्षाच्या बिबट्याशी झुंज दिली. त्या झटापटीत बिबट्या ठार झाला. सोमवारी सकाळी साडेसात वाजता हा थरार घडला. बिबट्याच्या हल्ल्यात यशवंत भाऊ कंक (वय ५०) हे गंभीर जखमी झाले, तर लक्ष्मण पांडुरंग पाटील.(वय ५५ ) व मारुती गणपती जाधव ( वय ५०, सर्व रा. लोळाणे) हे किरकोळ जखमी झाले. बिबट्या व यशवंत कंक यांच्यामध्ये सुमारे वीस मिनिटे जीवन मरणाची लढाई सुरु होती. डोंगरवस्तीमध्ये वसलेले लोळाणे एक हजार वस्तीचे छोटे गाव आहे. यशवंत हे सकाळी मुलीला कॉलेजला जाण्यासाठी जवळच्या बसथांब्यावर सोडून घरी परतत होते. याचदरम्यान, जवळच्या शेतातून बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. चेहऱ्यावर झेप घेतलेल्या बिबट्याने कंक यांचा उजवा हात जबड्यात पकडला व त्यांना जमिनीवर पाडले. कंक यांनी आरडाओरडा केला, तेव्हा शेजारील शेतात वैरण कापण्यास निघालेले लक्ष्मण पाटील व मारुती जाधव त्यांच्या मदतीसाठी धावले, तेव्हा बिबट्याने त्या दोघांवरही हल्ला चढविला. यशवंत यांच्या हाताला व पायाला गंभीर जखम झाल्याने ते बाजूला झाले. यावेळी लक्ष्मण पाटील व मारुती जाधव यांनी स्वताचा जीव वाचविण्यासाठी हातातील काठ्यानी प्रतिकार केला. झटापटीत बिबट्याच्या डोक्याला गंभीर मार बसला. त्यातच तो ठार झाला. रहदारीच्या रस्त्यावर सकाळी सकाळी झालेल्या या हल्ल्याने शाहुवाडी तालुक्यांतील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गंभीर जखमी झालेल्या यशवंत कंक यांना परळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. (प्रतिनिधी) वीस मिनिटे दिली बिबट्याशी झुंजहातामध्ये छत्री घेऊन चालत असताना मोहरी नावाच्या शेताजवळ अचानक प्राण्याने झडप घातली. सुरुवातीला कुत्रे वाटले, पण हात सोडत नसल्याने मी सरळ पाहिले तो बिबट्या होता. आरडाओरड करू लागताच त्याने खाली पाडले. क्षणात माझा मृत्यू डोळ्यासमोर दिसला. माझा गळा पकडू नये, यासाठी मी धाडसाने उजव्या हाताने त्याचा कान पकडून काखेत मुंडके दाबून धरले. तो ताकदीने मला हिसडा मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु मी हलू देत नव्हतो. त्याला पकडीत दाबून मी मोठ्याने ओरडत होतो. सुमारे वीस मिनिटे माझी झुंज सुरू होती. आरडाओरड ऐकून लक्ष्मण पाटील व मारुती जाधव मदतीसाठी धावून आले. ते दोघे आल्यानंतर मी बाजूला पडलो व त्याने दोघांवर हल्ला केला. लक्ष्मण व मारुती यांनी काठ्यानी प्रतिकार केला. या झटापटीत त्याच्या डोक्याला गंभीर मार बसला. त्यातच तो ार झाला. यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ तेथे आले. माझ्या हाताचा नसा तुटलेल्या होत्या. अंगाला घाम फुटलेला होता. रक्तबंबाळ हात पाहून लोकांनी मला तातडीने सीपीआरला दाखल केले. बिबट्याशी झुंज केली म्हणूनच माझे प्राण वाचले.‘बिबट्या नव्हे, समोर मृत्यूच दिसत होता...!‘मुलीला कॉलेजला सोडून घरी परत येत असताना अचानक बिबट्याने झडप घातली. समोर मृत्यू दिसत असल्याने धाडसाने त्याच्याशी झुंज केली. वीस मिनिटांच्या झटापटीनंतर बिबट्याने जबड्यात पकडलेला डावा हात सोडवून घेतला.’’ दैव बलवत्तर म्हणूनच यशवंत भाऊ कंक (वय ६०, रा. लोळाणे, ता. शाहूवाडी) यांचे प्राण वाचले. कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) ते सांगत असलेला थरार ऐकून डॉक्टरांसह नातेवाईकांच्या अंगावर शहारे आले. शाहूवाडी तालुक्यात डोंगरवस्तीमध्ये वसलेले लोळाणे एक हजार वस्तीचे छोटेखानी गाव. गावात एस.टी.ची सोय नाही. त्यामुळे येथील लोकांना एस.टी.साठी दोन किलोमीटर अंतरावरील बहिरेवाडी फाट्यावर यावे लागते. व्यवसाय शेतीचा.यशवंत कंक हे पत्नी बाळाबाई, मुलगी वनितासह राहतात. मुलगी वनिता पेरिड येथील महाविद्यालयात कला शाखेत पहिल्या वर्षात शिकते. बिबट्या केलेल्या हल्ल्याचा थरारक अनुभव सांगताना यशवंत कंक म्हणाले, सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मुलगीला कॉलेजला सोडण्यासाठी मी बहिरेवाडी फाट्यावर आलो. तिला व तिच्या मैत्रिणीला बसमध्ये बसवून परत घरी येऊ लागलो. वेळ सकाळची असल्याने रस्त्याला रहदारी नव्हती. मृत बिबट्याला पोलिस व्हॅनमधून दुपारी मलकापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेवून शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक सगुनाथ शुल्का, एम. व्ही. स्वामी, पोलीस निरीक्षक अनिल गाडे उपस्थित होते. बिबट्याच्या वृत्तामुळे गाड्या करून येथे लोक गर्दी करीत होते.या मार्गावर सकाळी गावातील पाच मुले व दोन मुली कॉलेजला जातात. शेजारच्या वस्तीतील (बहिरेवाडी) चौथीची चार मुले येतात. या मार्गावर सिमेंटच्या पाईपमध्ये बिबट्या बसला होता. यशवंतमुळे विद्यार्थ्यांवरील हल्ला टळला. या बिबट्याला वन विभागाने सोडले असावे, असे काहीजणांचे म्हणणे आहे.
त्या पठ्ठ्यांनी दिली बिबट्याशी झुंज !
By admin | Published: October 04, 2016 1:26 AM