कोल्हापूर : महावीर कॉलेज ते न्यू पॅलेसकडे जाणाºया रहदारीच्या रस्त्यावर दोन्ही बाजंूची वाहने थांबवून रस्त्याच्या मधोमध वाढदिवस साजरा करून धिंगाणा घालणाºया कनाननगरातील तिघा तरुणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवित मगरुरीची भाषा उतरविली. हा प्रकार शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला.
संशयित ओमकार संजय पाटील (वय २०), परशराम बाळू बिरंजे (२१), महेश उमेश लोखंडे (२१, तिघे रा. कनाननगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार रोहित सूर्यवंशी, सागर भास्कर (रा. कनाननगर), सोहेल डांगे (रा. आंबेवाडी, ता. करवीर) यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल केला.
याबाबतची अधिक माहिती अशी, ओमकार पाटील याचा शनिवारी वाढदिवस असल्याने त्याचे २५ कॉलेज मित्र एकत्र जमले. त्यांनी महावीर कॉलेज ते न्यू पॅलेस रस्त्यावरील एका बेकरीसमोर भर रस्त्यावर दुचाकी उभी केली. पाटील यांच्या मित्राने रस्त्यावरच केक कापून एकमेकाला भरवित ते धिंगाणा घालू लागले. रस्त्यावरील वाहनधारक हा प्रकार निमूटपणे पाहत होते. कनाननगरातील तरुण असल्याने त्यांना रोखण्याचे धाडस कोणी केले नाही. दरम्यान, या प्रकाराची माहिती नागरिकांनी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना दिली. ते तक्रार दिनानिमित्त पोलीस ठाण्यातच बसून असल्याने त्यांनी तत्काळ पथक रवाना केले. पोलीस आल्याचे पाहून तरुणांनी वाट दिसेल तिकडे पलायन केले. यावेळी ओमकार पाटीलसह परशराम बिरंजे, महेश लोखंडे सापडले.नगरसेवकाच्या मुलालाही सोडले नाहीया प्रकारानंतर एका नगरसेवकाचा मुलगा थेट शाहूपुरी पोलीस ठाण्यात आला. डॉ. अमृतकर यांनी त्याला काय पाहिजे, अशी विचारणा केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अमृतकरांना तो वाढदिवस साजरा करणाºया तरुणांच्या बाजूने आल्याचे समजताच त्यांनी त्यालाही ताब्यात घेऊन खाकी दाखवा, असे सांगितले. मुलगा पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजताच नगरसेवकानेही पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. अधिकाºयांना हात जोडून मुलाचा या प्रकरणात काही संबंध नसल्याचे सांगून त्याला सोडवून नेले.