कोल्हापूर : ‘ज्यांनी केला घात, त्यांना पुन्हा नाही साथ,’ अशी घोषणा करून कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी रविवारी येथे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठीची दिशा स्पष्ट केली. चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी ‘नेत्यांनी आदेश दिल्यास सतेज पाटील यांच्या घरी जाईन,’ असे वक्तव्य केले होते, तो मनोमिलनाचा प्रस्तावही त्यांनी धुडकावला.कोल्हापूर जिल्हा युवक कॉँग्रेसच्या परिवर्तन अभियानाची सांगता सभा जवाहरनगर चौकात झाली; यावेळी ते बोलत होेते. प्रमुख उपस्थिती युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज विलासराव देशमुख, प्रतिमा सतेज पाटील, उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक शारंगधर देशमुख, प्रवीण केसरकर, तौफिक मुल्लाणी, युवक कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक थोरात, उपाध्यक्ष बयाजी शेळके, कल्याणी माणगावे, वैशाली पसारे, आदींची होती.लोकसभा निवडणूक जवळ आल्याने काही मंडळी घरी येऊन भेट घेतो म्हणून लागली आहेत; पण आता निर्णय पक्का झाला असून त्यात बदल होणार नाही. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मदत करणार नाही, असा पुनरुच्चार पाटील यांनी केला.आमदार पाटील म्हणाले, जनता भाजप सरकारला कंटाळली असून परिवर्तन अटळ आहे. अहमदनगर व लातूरच्या बरोबरीने विधानसभेत कोल्हापूरचे आमदार असतील. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे आम्ही एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातून कॉँग्रेसचे सहा आमदार निवडून येण्यास अडचण नाही.धीरज देशमुख यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. या सरकारकडून गेल्या साडेचार वर्षांत लोकांना मिळालेल्या दोन गोष्टी म्हणजे खोटी आश्वासने व खरा त्रास या आहेत. हे सरकार ‘आॅनलाईन’वर असून जनता व शेतकरी ‘सलाईन’वर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.विधान परिषदेच्या माध्यमातून सतेज पाटील हे सध्या रणजी खेळत असून, ते येणाºया विधानसभेच्या वनडेसाठी तयार आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहनही त्यांनी केले.सत्यजित तांबे यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यासाठी अनेक ‘आयटी’चे प्रकल्प आणले; परंतु गेल्या साडेचार वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही ‘आयटी’ प्रकल्प आणला नसल्याची टीका केली.धीरज यांच्या भाषणाने विलासरावांची आठवणआक्रमक शैलीत मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणाºया धीरज देशमुख यांना कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे टाळ्यांची दाद मिळाली. त्यांच्या भाषणशैलीवर त्यांचे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख यांचाच प्रभाव दिसून आला. या निमित्ताने व्यासपीठावरील नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही काही काळ विलासरावांची आठवण झाली. आमदार सतेज पाटीलही यांनीही धीरज यांच्या भाषणाने प्रभावित होऊन, ‘मला काही काळ देशमुखांनाच ऐकल्यासारखे वाटल्याचे आवर्जून सांगितले.पालकमंत्र्यांनी दिले फक्त दोन कोटीपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेसाठी फक्त दोन कोटींचा निधी दिला आहे. यापेक्षा जादा निधी एका प्रभागात खर्च झाला आहे. अशा शब्दांत उपमहापौर भूपाल शेटे यांनी टोला लगावला. शहरातील मंडळांना मागेल तितके पैसे देणाºया पालकमंत्र्यांनी ते पैसे विकासकामांसाठी दिले असते तर शहर उजळून निघाले असते, असेही ते म्हणाले.
ज्यांनी केला घात, त्यांना नाही साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 1:16 AM