कोल्हापूर : गोकुळमध्ये येथून पुढे कोणतीही बडदास्त चालणार नसून, आतापासूनच संघाचे ओपल हॉटेलमधील खाते बंद करण्याची सूचना नवनिर्वाचित संचालक नविद मुश्रीफ यांनी केली. संचालकांच्या फार्महाऊस, घरात काम करून गोकुळचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आजपासूनच कामावर यावे, अन्यथा पुढील महिन्याचा पगार मिळणार नाही, असा दमही त्यांनी दिला.गोकुळच्या नवनिर्वाचित १७ संचालकांचा शनिवारी कार्यालयीन प्रवेश झाला. सकाळी अकरा वाजता संघाच्या ताराबाई पार्क आवारातील हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्पावर गेले. तिथे संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यालयीन प्रवेश केला.
यावेळी कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. तेथून संचालकांनी हलसिध्दनाथाचे दर्शन घेतले. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नवीद मुश्रीफ, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, रणजितसिंह पाटील, अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रा. किसन चौगले, बाबासाहेब चौगले, एस. आर. पाटील, अभिजित तायशेटे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर उपस्थित होते. विरोधी चार संचालक अनुपस्थित होते.