लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत दुधाला दहा रुपये जास्त दर देतो म्हणणारे आता दोन रुपयांवर आले असल्याचा टोला सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार पी. एन. पाटील यांनी मंगळवारी येथे लगावला. सत्तारुढ राजर्षी शाहू आघाडीची घोषणा आमदार पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी अध्यक्ष अरुण नरके, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील ताराराणी चौकातील हॉटेलमध्ये झाली.
आमदार पाटील म्हणाले, ‘गोकुळ’ने कायमच देशात व राज्यातील अन्य कोणत्या संघाने दिला नाही इतका चांगला दिला आहे. शासनाच्या महानंदा डेअरीपेक्षाही गोकुळ लिटरला ५ रुपये जास्त दर देते. गोकुळ संघ दूध फरक ९८ कोटी रुपये देतो. उत्पन्नातील ७० टक्के रक्कम उत्पादकाला परत देण्याचा निकष असताना गोकुळ मात्र ८१ टक्के परत देतो व अवघ्या १९ टक्क्यांवर संघाचे व्यवस्थापन चालते. एवढ्या काटकसरीने कारभार सुरू असलेला महाराष्ट्रात हा एकमेव दूध संघ असावा. देशभरातून ‘गोकुळ’चे काम पाहण्यासाठी लोक येतात हेच त्याचे बलस्थान आहे. आम्ही ते गेल्या तीस वर्षांत निर्माण केले आहे. विरोधकांकडे बोलायला काही मुद्दे नाहीत त्यामुळे चांगल्या चाललेल्या संघावर त्यांच्याकडून आरोप सुरू आहेत.
संस्था-दूध संघ कुणाचे मोडून पडलेत हे कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे, आम्ही त्याबद्दल काही बोलणार नसल्याचे सांगून आमदार पाटील म्हणाले, जिल्हा बँक चांगली चालली आहे तर आम्ही तिला चांगलेच म्हणतो. ‘गोकुळ’ही चांगला चालला असताना गेली सहा वर्षे त्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. संघाची निवडणूक आम्ही गेली तीस वर्षे लढवत आहोत. त्यामुळे आताही निवडणुकीला आम्ही भीत नाही.
धनंजय महाडिक म्हणाले, गेली तीस वर्षे संघाचा कारभार पारदर्शकपणे सुरू आहे. संघाला आणखी नावारूपाला आणण्यासाठी संधी द्या.
ज्येष्ठ संचालक रणजित पाटील यांनी उमदेवारांच्या यादीचे वाचन केले. यावेळी संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे, माजी आमदार संजय घाटगे, भरमू पाटील, बाबासाहेब पाटील-सरुडकर, सत्यजित पाटील सरुडकर, अमल महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
....म्हणून शौमिका महाडिक रिंगणात
गेली तीस वर्षे आपण संघाचे नेते असताना कधीच तुमच्या घरातील उमेदवार दिला नव्हता, आताच तो का दिला, अशी विचारणा पत्रकारांनी महादेवराव महाडिक यांना केली परंतु त्याचे उत्तर आमदार पाटील यांनीच दिले. ते म्हणाले,नेत्यांच्या कुटुंबातील उमेदवार हवेत, असा विचार झाला; परंतु आमच्या कुुटुंबात कोण उमेदवार देणार नव्हतो. त्यामुळे महाडिक यांना आग्रह धरला. हा महाडिक यांचा निर्णय नसून आम्ही सर्वांनी आग्रह धरल्यानेच त्यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली.