कोल्हापूर : राजकीय पक्षांच्या कार्यालयाचे उद्घाटन, अन्य कार्यक्रमांना परवानगी मिळते. मात्र, आम्हाला राधानगरी धरण येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यास परवानगी मिळत नाही, हे दुर्भाग्य आहे. परवानगी नाकारण्याचे काम ज्यांच्या कोणाच्या सांगण्यावरून झाले आहे, त्यांना शाहूप्रेमी जनता विसरणार नाही. परवानगी नाकारणाऱ्यांना येत्या काळात त्याचे चोख उत्तर मिळेल, असा इशारा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी गुरुवारी दिला.श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आम्ही राधानगरी धरण येथे साजरी करण्याचा निर्णय घेतला. जयंतीच्या आदल्या दिवशी सायंकाळी सहा वाजता याठिकाणी सोहळा साजरा करण्यास परवानगी नाकारण्यात आली.
पोलिसांनी तेथे बंदोबस्त लावून लोकांना अडविले, तरीही तेथे सामान्य लोक, कार्यकर्ते आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. शाहू जयंती साजरी करणे हा गुन्हा होता हे पहिल्यांदाच कळाले. पाटबंधारे विभाग सायंकाळी सहानंतरही इतक्या जागरूकपणे काम करते ते देखील समजले.
मुरगूडकरांबाबत मला काही बोलायचे नाही. मात्र, ज्यांच्या आदेशावरून पत्रक काढण्यात आले. जे स्वयंघोषित पुरोगामी आहेत आणि ज्यांनी वारंवार गोमूत्राला नावे ठेवली, त्यांना काही का असेना गोमूत्राची आठवण झाली. पत्रक काढणाऱ्यांनी त्यांच्या नेत्याला घेऊन गोमूत्र शिंपडण्याच्या उद्देशाने धरणावर जावे. त्यानिमित्त त्यांना धरण तरी पाहता येईल, असे समरजित घाटगे यांनी सांगितले.