विश्वास पाटीलकोल्हापूर : कंपनीचे कार्यालय माहीत नाही..ती कशात पैसा गुंतवते माहीत नाही. लोक कोण आहेत याचाही पत्ता नाही..परंतु गावोगावी लाट आली की लाख रुपये भरले की तीन वर्षात रक्कम दुप्पट होते..कंपनीला पैसा गोळा करून देणारेही तुमच्याच गावातले..अहो, बापू गुंतवा पैसे..मी तुमच्या पैशाची हमी घेतो, काय झाले तर मी तुमचे पैसे भागवतो असे छातीवर हात ठेवून सांगणारेच आता गायब झाले आहेत. त्यांचे फोन बंद आहेत. त्यामुळे या पैशावरून गावागावांतील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.अमूक एवढा लाभ मिळतो असे आमिष घेऊन कंपनीचे लोक तुमच्यापर्यंत आले नव्हते. तुमच्याच गावांतील लोक कंपनीसाठी काम करत होते. त्यातील अनेकांनी हात धुवून घेतले. गाड्या उडवल्या. दुबईच्या टूर केल्या. कुणी सोने घेतले..अनेकजण पैशाचा धूर सोडत होते. ज्यांना स्वच्छ मराठीत स्वत:चे नाव लिहिता येत नाही असेही लोक रात्रीत लखपती झाले.
त्याने पैसे गुंतवले, त्याला इतके लाख मिळाले, त्याला क्रेटा, ब्रिझा मिळाली अशी हवा तयार झाल्यावर जे पैसे गुंंतवत नव्हते ते नालायक ठरू लागले. त्यातूनच साखळी तयार झाली. लोकांतच या कंपन्यांना पैसे देण्यासाठी जणू स्पर्धाच लागली. कंपनीचे काही होवू दे, मी कुठे जातोय..मी गावातलाच आहे असे सांगणारेही या फसवणुकीस तितकेच जबाबदार आहेत.
सुभेदार बेपत्ता..या कंपनीचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार हा सध्या गायब आहे. त्याचे मोबाइल लोकेशन हैदराबाद दाखवत आहे. परंतु फोन बंद असल्याने संपर्क होत नाही. त्यांची कोल्हापुरातील तिन्ही कार्यालयेही बंद आहेत.
डॉन कुठे आहेत..?सुभेदार यांच्यापेक्षा कंपनीत लीडर असलेल्या सात लोकांनी यातील खोऱ्याने पैसा ओढल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. हे सगळे फसवणुकीतील डॉन आहेत. त्यामध्ये एक डायमंड आहे. वारणा खोऱ्यातील एकनाथ, करवीर पश्चिम भागातील विजय, विद्यापीठातील हजारे, पलूसचा संतोष, गडहिंग्लजचे अमर व रवी, ही कंपनी म्हणजे माझ्याच नावाची आहे असे सांगणारा अमित यांचा समावेश आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये काम करणारा साधा कॅमेरामन चित्रीकरण करताना पडल्यावर त्याला उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून लोकवर्गणी काढावी लागली होती. तो या धंद्यात पडल्यावर मर्सिडीज गाडीतून फिरत होता. आता त्यांचे फोन बंद आहेत.
दागिने गहाण ठेवून गुंतवले पैसेअनेकांनी स्वत:जवळ पैसे नव्हते तर पत्नीचे दागिने गहाण ठेवून यामध्ये पैसे गुंतवले आहेत. ते त्यांनी पत्नीलाही सांगितलेले नाही. आता तिला काय सांगायचे आणि गहाण ठेवलेले दागिने सोडवून कसे आणायचे असा पेच त्यांच्यासमोर आहे. काहींनी बँकांतील ठेवी मोडल्या, काहींनी ट्रॅक्टर विकले. अगोदर कुणी दोन लाख घातले. ते परत मिळाल्यावर त्यात आनंद मानून गप्प बसण्यापेक्षा आपले दोन व मिळालेले दोन असे चार लाख अनेकांनी पुन्हा गुंतवले..आता ते सगळेच पाण्यात गेले. ‘बापच्या बाप गेला आणि बोंबलताना हातही गेला’ अशी स्थिती कित्येकांची झाली आहे.