राजाराम लोंढे ।कोल्हापूर : मतदारसंघातील रस्ते, मंदिरे, पूल, सांस्कृतिक सभागृह बांधणे हे लोकप्रतिनिधींचे कामच आहे. ही कामे आपण प्राधान्याने केलीच; पण सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरची लढाईही केली. मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत ७३४ कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला. नऊ पूल उभारून दळणवळणाला चालना दिली. टोल, हद्दवाढ, प्राधिकरण, मराठा आरक्षण या आंदोलनात केवळ बघ्याची भूमिका न घेता मैदानात उतरून यश मिळविल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.
आम्ही ‘कुंभी’ कारखान्यातील सहवीज प्रकल्प, कुंभी-कासारी शिक्षण प्रसारक मंडळ, कुंभी बॅँक, यशवंत संघ, आदी संस्थांच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार दिला. आजोबा स्वर्गीय डी. सी. नरके यांनी काढलेल्या संस्था आम्ही सक्षमपणे चालवत आहोत. आम्ही किती हातांना काम दिले, याची मापे पी. एन. पाटील यांनी काढण्यापेक्षा स्वत:च्या संस्थांकडे लक्ष द्यावे. मतदारसंघातील तरुणांबद्दल एवढी आस्था होती तर ‘भोगावती’तील ५८० कामगारांच्या पोटावर लाथ का मारली? तिथे कामगारांची गरज नव्हती तर लगेच आपल्या बगलबच्च्यांचे १५० कामगार कसे भरले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. ‘गोकुळ’मध्ये आठ-दहा वर्षे काम करणाºया कामगारांना काढून त्या ठिकाणी गावातील नेत्यांची पोरं लावली. ज्यांच्या दारात आता तुम्ही मतासाठी जाता, त्या सामान्य माणसाची आठवण पी. एन. पाटील यांना का झाली नाही? तुमच्या संचालकांनी कशा पद्धतीने नोकरभरती केली, हे जिल्ह्याला माहीत असून तुमचा स्वच्छतेचा बुरखा फाटला आहे.
आम्ही ‘कुंभी’मध्ये गट-तट न पाहता १० वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना कायम करतो. आजपर्यंत हजारो तरुणांना नोकºया दिल्या; पण त्यांच्या अर्ध्या कप चहात मिंधा नाही. फोंड्या माळावर उभ्या केलेल्या राजीवजी सूतगिरणीच्या कारभाराचे तुणतुणे ‘पी. एन.’ वाजवतात, त्याची आज अवस्था काय आहे? स्थानिक कामगारांना किती पगार देता? कामगारांना का कमी केले? निवृत्ती संघ रसातळाला कोणी घालविला? याची उत्तरे पी. एन. पाटील यांनी करवीरच्या जनतेला द्यावीत. नुसत्या सहानूभूतीने निवडणुका जिंकता येत नाहीत. तुम्हाला कशाबद्दल मतदारांनी सहानुभूती दाखवायची? संपर्क नसल्याने मतदारांत नाराजी आहे. ती घालवण्यासाठी ते स्वत:च सहानुभूतीचा आव आणत आहेत. पाच वर्षे पायांना भिंगरी लावून मतदारसंघात विकासकामे केली, संपर्क ठेवला, लोकांच्या सुखदु:खात सहभागी झाल्याने जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबतच आहे. महापुराच्या काळात घरदार सोडून आठ-दहा दिवस मानवतेच्या भावनेने लोकांना मदत केली; पण दुर्दैवाने महापुरात मी केलेल्या मदतीची पी. एन. पाटील टिंगल करीत आहेत. सामान्य माणसावर ओढवलेल्या प्रसंगाची टिंगल करणाऱ्यांना जनता माफ करणार नसल्याचे नरके यांनी सांगितले.
दादासाहेब पाटील-कौलवकर यांनी स्थापन केलेल्या ‘भोगावती’वर तुम्ही चेअरमन म्हणून बसला. ज्या ‘गोकुळ’च्या जिवावर राजकीय उड्या मारता, त्याची स्थापना कोणी केली? आनंदराव पाटील-चुयेकर यांनी लावलेले रोपटे अरुण नरके यांनी वाढविले आणि तेथील मलई खाणारे आम्हाला प्रश्न विचारत असल्याचा टोला नरके यांनी लगावला.ज्या राजीवजी सूतगिरणीची टिमकी पी. एन. पाटील वाजवतात तेथील स्थानिक कामगारांना त्यांनी का कमी केले? बिहारी कामगारांच्या बळावर ती का चालवावी लागली? याचे त्यांनी उत्तर द्यावे. स्वर्गीय दादासाहेब पाटील-कौलवकर यांनी काढलेल्या ‘भोगावती’ कारखाना व आनंदराव पाटील-चुयेकर यांनी काढलेल्या ‘गोकुळ’वर उपरे नेतृत्व करणाºयांनी आमची मापे काढू नयेत, असा टोला आमदार चंद्रदीप नरके यांनी ‘लोकमत’शी बोलताना हाणला.
मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत ७३४ कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला. टोल, हद्दवाढ, प्राधिकरण, मराठा आरक्षण या आंदोलनात बघ्याची भूमिका न घेता मैदानात उतरलो. महापुरासारख्या आपत्तीवेळी मानवतेच्या भावनेने पूरग्रस्तांना मदत केली.- चंद्रदीप नरके