कसबा सांगाव : महावितरणचे कार्यालयीन अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची साखळी असल्याने ५.५० लाखांची डिपॉझिट रक्कम भरून दोन महिने झाले, तरी नवीन ट्रान्सफॉर्मर दिला जात नाही. नाहक वीज काार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असून, तेथील अधिकारी सोनवणे व सबठेकेदार हे ट्रान्सफॉर्मर भाडेतत्त्वावर घ्यावा, यासाठी उद्युक्त करीत आहेत. या भ्रष्टाचारी अधिकारी वर्गास कंटाळून मी विमनस्क अवस्थेत गेलो असून, आत्महत्या करण्याचा विचार करीत आहे, अशी माहिती पंचतारांकित कागल हातकणंगले औद्योगिक वसाहतीमधील ज्येष्ठ उद्योजक व मॅक असो. चे माजी संस्थापक, अध्यक्ष मनोहर शर्मा यांनी असोसिएशनच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मेक इन इंडिया व महाराष्ट्र राज्य यांच्या धोरणानुसार आम्ही नवीन उद्योग उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्यासाठी स्वत:च्या इमारतीवरती तीन कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. २४ आॅक्टोबरला २५० के.व्ही.च्या मंजुरीचे पत्र मिळाले. लगेच दुसऱ्या दिवशी ५.५० लाखांची रक्कम भरल्यानंतरही आजपर्यंत लाईट कनेक्शन मिळालेले नाही. त्याचे कारण देताना बीएसआय सर्टिफाईड ट्रान्सफॉर्मर असावा, असा आग्रह अधिकाऱ्यांकडून धरला जात आहे. मात्र, बीएसआयच्या देशात दोन ते तीनच कंपन्या आहेत. याबाबत वीज वितरणचे अधिकारी सोनवणे यांना भेटलो असता त्यांनी दिलेली उत्तरे संशयास्पद होती. ते भाडेतत्त्वावर ट्रान्सफॉर्मर घेण्यास उद्युक्त करीत होते. त्याचे भाडे महिन्याकाठी ३५ हजार रुपये होते. तसेच वीज खर्च वेगळा. दर तीन महिन्यांनी त्याच्या परवान्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागते, असे सांगितले. सरकार बदलले, पण अधिकारी तेच राहिल्याने आशा संपली म्हणून शेवटचा प्रयत्न करायचा म्हणून पंतप्रधान कार्यालयास लेखी तक्रार व पत्रकारांना सर्व माहिती देऊन दाद मागण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. सोबत लेखी निवदेन दिले असून, यावर मनोहर शर्मा व मॅकचे अध्यक्ष संजय जोशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष गोरख माळी, मोहन कुशिरे, अशोक दुधाणे, विठ्ठल पाटील, अमृतराव यादव, सत्येन शर्मा, मॅकचे सेक्रेटरी शंतनू गायकवाड उपस्थित होते.
महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा विचार
By admin | Published: December 31, 2016 1:26 AM