आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम होत आहे. अशा गैरप्रकारांवर आळा घालणेसाठी व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी प्रतिबंधात्मक कृती समिती नेमावी. यासह अन्य मागण्यांसाठी सुरु असलेल्या मार्ड च्या संपाला पाठींबा देण्यासाठी गुरुवारी कोल्हापूर मेडीकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सर्व डॉक्टरांच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला. सीपीआर हॉस्पीटलमधून निघालेल्या मोर्चात हजारो डॉक्टरांनी सहभाग घेऊन निषेध नोंदवला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले.
मोर्चाची सुरुवात सकाळी दहा वाजता सीपीआर रु ग्णालय येथे झाली. मोर्चाचे नेतृत्व कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण हेंद्रे यांनी केले. यात कोल्हापूर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, निमा, महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडेन्ट डॉक्टर्स (मार्ड) कोल्हापूर होमिओपॅथि असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा आयुर्वेदिक असोसिएशन, कोल्हापूर मानसपोचार तज्ज्ञ संघटना , कोल्हापूर जिल्हा नेत्ररोगतज्ज्ञ संघटना, महाराष्ट्र सर्जिकल सोसायटी कोल्हापूर शाखा, क्रीटीकल केअर सोसायटी, इंडियन सोसायटी आॅफ अॅनेस्थेशिया, मराठा चेंबर आॅफ मेडीको , बालरोगतज्ज्ञ संघटना, कोल्हापूर जिल्हा अस्थिरोगतज्ज्ञ संघटना आदी संघटनांचे एक हजाराहून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी भेटण्यास आलेल्या आंदोलनकर्त्या डॉक्टरांना निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी सुरक्षेचे सर्व उपाय योजनांसंबधी सर्व उपाय योजना करण्याकरीता बैठक बोलावण्यात येईल. त्यात सीपीआरचे अधिष्ठाता, मार्डचे प्रतिनिधी, जिल्हा पोलीस प्रशासन यांचा समावेश असेल. असे आश्वासन दिले.
यावेळी केएमए सचिव डॉ. आर.एम. कुलकर्णी, डॉ. भारत कोटकर, डॉ. प्रकाश संघवी, डॉ. मानसिंग घाटगे, डॉ. प्रताप वरुटे, डॉ. संदीप पाटील, डॉ. राहूल शिंदे, डॉ. माधवी लोकरे, डॉ. राजेश पाटील, डॉ. शिवराज देसाई, डॉ. अजित पाटील, डॉ. मिलिंद सबनीस, डॉ. पद्मराज पाटील, मार्डचे डॉ. रामराजे भोसले, सचिन शिंदे, सत्येंद्र ठोंबरे आदी डॉक्टर उपस्थित होते.
मागण्या अशा रुग्णालयात जाण्यासाठी प्रत्येकी एकच दरवाजा असावा. तेथे शस्त्रधारी सुरक्षारक्षक कायमस्वरुपी असावा.अपघात विभाग, नवजात शिशू कक्ष, अतिदक्षता विभाग, प्रसूती विभाग या अत्यंत वर्दळीच्या व संवेदनशील विभागांमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणुक व्हावी.
रुग्णालय परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेटस उभारण्यात यावेत.रुग्णांच्या नातेवाईकांच्या नातेवाईकांची प्रमाणापेक्षा होणारी गर्दी टाळण्यासाठी व त्यातून उदभवणाऱ्या अनुचित प्रकार टाळण्यासाठी केवळ दोन नातेवाईकांना पास देण्याची सोय व्हावी.
नेमणुकीवरील डॉक्टरांसोबत अनुचित प्रकार घडल्यास त्यासंबधीची तक्रार रुग्णालय प्रशासनाने करावी. त्याचा पाठपुरावाही करावा.
डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यास सर्व कर्मचाऱ्यांना सुचित करण्यासाठी अलार्म सिस्टिम बसवावी.गैरप्रकारांवर आळा घालणेसाठी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक प्रतिबंधात्मक कृती समिती स्थापन करावी. पिस्तूल घेण्यास परवानगी द्या
मोर्चात सहभागी झालेल्या डॉक्टरांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर दालनातून बाहेर पडताना अनेक डॉक्टरांच्या तोंडी प्रशासन जर आम्हाला सुरक्षा व्यवस्था पुरवू शकत नसेल तर प्रत्येकाला पिस्तूल घेण्यास परवानगी द्यावी अशी चर्चा करीत होते. जोपर्यंत सुरक्षा व्यवस्थेसह अन्य मागण्या सरकारकडून पुर्ण होत नाहीत, तोपर्यंत निवासी डॉक्टरांसह खासगी व्यावसायिक डॉक्टरही आपले व्यवसाय बंद ठेवणार आहेत. शासनाच्या निर्णयानंतर हे सर्व डॉक्टर रुग्णसेवा पुर्ववत करतील. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे.- डॉ.प्रविण हेंद्रे, अध्यक्ष, के.एम.ए.