लोकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील आठ वर्षीय मानांकराजे अभिजित पाटील हा ‘डीएमडी’ या दुर्मीळ आजाराने त्रस्त आहे. त्याच्या उपचारासाठी अडीच कोटी रुपयांची गरज असल्याने तो उपचारांपासून दूर आहे. हा चिमुकला अन्य मुलांप्रमाणे आपल्या पायावर उभा राहावा, यासाठी सीमाभागातून मदतीचे हजारो हात पुढे येत आहेत. दोन महिन्यात तब्बल १५ लाखांहून अधिक निधीही त्याच्या खात्यावर जमा झाला आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून मानांकवर बेंगलोरमध्ये उपचार सुरू करण्याचा निर्णयही त्याच्या कुंटुंबीयांनी घेतला आहे. पाटील कुटुंबीय अनेक वर्षांपासून निपाणी येथेच वास्तव्याला आहे. मानांकला डीएमडी हा दुर्मीळ आजार जडल्याने सध्या त्याला नीट चालता-पळता येत नाही. त्याच्या पायाचे स्नायू आकुंचन पावत आहेत. बंगलोरच्या डिस्ट्रॉफी ॲनिहिलेशन रिसर्च ट्रस्टने अनेक चाचण्या करून हा आजार झाल्याचे निदान केले. मात्र, उपचाराचा खर्च त्याच्या कुटुंबीयांना पेलवत नसल्याने मानांकला त्याचे बालपण परत मिळवून देण्यासाठी शेकडो दातृत्वाचे हात पुढे येत असून, मानांकच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन पाटील कुटुंबीयांकडून करण्यात आले.
स्वाती पाटील, मानांकची आई देणगीसाठी तपशील गुगल पे / फोन पेसाठी मोबाईल नंबर (स्वाती पाटील) ८२७५३०२९६६ मदतीसाठी बँक खाते क्रमांक : ७००७०१७१७१९०३५४ (येस बँक, शाखा - अंधेरी ईस्ट)
खातेदाराचे नाव : मानांकराजे पाटील