कोल्हापूर : येत्या १५ आॅक्टोबरला कोल्हापुरात होणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चामध्ये काळा कोट या ड्रेसकोडसह हजारो वकील सहभागी होणार आहेत. या दिवशी कामकाज बंद ठेवण्यात येणार असून एकाही पक्षकाराचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. मोर्चानंतर दसरा चौकातील स्वच्छतेची जबाबदारी घेतली जाईल, असे प्रतिपादन बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांनी केले. जिल्हा न्यायालयातील शाहू सभागृहात गुरुवारी मराठा मूकमोर्चात सहभागाबद्दल आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. अॅड. मोरे म्हणाले, ब्रिटिशांविरोधात सन १८१८ मराठ्यांचे युद्ध झाले होते. त्यावेळी सर्व मराठा समाज एकत्रित आला होता. त्यानंतर आता मराठा समाज एकत्र येणार आहे. शांतपणे समाजबांधव एकजूट दाखवत आहे. या दिवशी ‘नो व्हेईकल डे’ असल्याने न्यायालयीन कामकाज होणार नाही. त्यामुळे सर्व पक्षकारांना न्यायालयात न येता परस्पर मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. या दिवशी सर्व वकील सकाळी ८.३० वाजता सीपीआरसमोरील जुन्या न्यायालयाच्या आवारात जमतील. यावेळी ते पारंपरिक काळा कोट व पांढरी पँट या ड्रेसकोडसह उपस्थित राहणार आहेत तेथून सर्वजण दसरा चौकात येऊन मोर्चात सहभागी होतील. यावेळी अॅड. अरुण पाटील, सर्जेराव खोत, अॅड. महादेवराव आडगुळे, कोमल राणे, विजयसिंह पाटील, शिवराम जोशी, व्ही. आर. पाटील, कल्पना माने, राजेंद्र किंकर, आर. आर. कडदेशमुख आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. खंडपीठाच्या मागणीची दखल घ्यासहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी आम्ही लढा देत आहोत. ही मागणीही मराठा मूकमोर्चाच्या मागणीमध्ये समाविष्ट करावी, अशी विनंती सर्व वकील मंडळीतर्फे वसंत मुळीक यांच्याकडे केली. भविष्यकाळात सरकारी नोकरीत मराठा दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी परिस्थिती समाजबांधवांची झाली आहे, अशी खंत वसंतराव मुळीक यांनी बोलून दाखविली. खोट्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. या दृष्टीने काम होणे गरजेचे असल्याचे मत अॅड. कोमल राणे यांनी मांडले. बार असोसिएशनच्या कार्यालयाला कुलूप लावा. कारण मराठा समाजाला मदत करण्यासाठी इतर जाती धर्मातील लोकही सरसावले आहेत. त्यामुळे पक्षकारही येणार नाहीत. याची जाणीव ठेवून कार्यालयाला कुलूप लावा, असे मत माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील शाहू सभागृह येथे गुरुवारी मराठा मूकमोर्चात सहभागी होण्याबद्दल आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
हजारो वकील रस्त्यावर उतरणार
By admin | Published: October 07, 2016 1:05 AM