राज्यातील साडेसहा हजार विनाअनुदानित शाळांचा उद्या बंद
कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने शनिवारी, दि. १ फेबु्रवारी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये राज्यातील ६५00 हजार विनाअनुदानित शाळा आणि त्यामधील सुमारे ४० हजार शिक्षक, कर्मचारी सहभागी होणार आहेत.
विनाअनुदानित शिक्षक आणि कर्मचारी हे शाळा बंद ठेवून शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात संस्थाचालक महामंडळ, शैक्षणिक व्यासपीठ, तसेच राज्यातील अनेक संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे. राज्यात आता सत्ताधारी असलेल्यांपैकी काही राज्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षांत आमची सत्ता आल्यास कोणीही अनुदानापासून वंचित राहणार नाही, असा शब्द कृती समितीला दिला होता; त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कोणतेही कारण न सांगता विनाअट प्रचलित नियमानुसार १00 टक्के अनुदान दिले पाहिजे. त्यासह प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अशी सर्व विनाअनुदानित शिक्षकांची मागणी आहे. आमच्या आंदोलनाला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने पाठिंबा जाहीर केला असल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी गुरुवारी दिली.
प्रमुख मागण्या* २० टक्के अनुदान पात्र शाळांना प्रचलित नियमानुसार १00 टक्के अनुदान मिळावे.* प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या अघोषित शाळा निधीसह घोषित कराव्यात.* शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे.* विनाअट अनुदान देण्यात यावे.
गेल्या २0 वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षक शासनाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत; मात्र अनेक प्रश्न, मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. त्याच्या पूर्ततेबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा, कृती समितीच्या वतीने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल. शाळा बंदच्या दिवशी आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.- खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती