कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी खंडपीठ कृती समितीच्या ‘काम बंद आंदोलना’त पाच वर्षांपर्यंत प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांनी सहभागी घेतला. वकिलांनी सोमवारपासून न्यायालयीन कामकाजावर असहकार आंदोलनाची सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत सहा हजार खटल्यांचे कामकाज ठप्प राहिले. कसबा बावडा रोडवरील न्यायसंकुलाच्या प्रवेशद्वारावर मंडप टाकून आंदोलन सुरू आहे. येत्या ३० मार्चपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. दोन दिवसांत न्यायालयात होणाऱ्या एकाही सुनावणीसाठी वकील उपस्थित राहिले नाहीत. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आणि रत्नागिरी बार असोसिएशनने न्यायालयीन कामकाजावर असहकार आंदोलन पुकारले आहे.कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन झाल्यास त्याचा मोठा फायदा ज्युनिअर वकिलांना होणार आहे. सध्या सहा जिल्ह्यांतील ६० हजारांहून अधिक खटले मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सर्किट बेंचमुळे अनेक खटले मार्गी लागू शकतील, असे आंदोलनातील वकील योगेश हुपरीकर यांनी सांगितले.
आंदोलनात अॅड. प्रशांत चिटणीस, उपाध्यक्ष आनंदराव जाधव, खजानिस सुशांत गुडाळकर, माजी अध्यक्ष विवेक घाटगे, प्रकाश मोरे, अजित मोहिते यांच्यासह धैर्यशील पवार, सुदर्शन पाटील, ओंकार देशपांडे, पी. जी. पाटील, रणजित साळोखे, नवतेज देसाई, हर्षवर्धन राणे, सचिन मुल्ला, सूरज भोसले, अक्षय कोरडे, राहुल शेळके, विक्रांत इंगवले आदी सहभागी झाले. खंडपीठ कृती समिती आंदोलनाला सातारा जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक शेख, मेनन आणि मेनन कामगार कर्मचारी संघटनेने सचिव सुरेश पाटील यांनी पाठिंबा दर्शविला.