कोल्हापूर : ‘गुगल पे’च्या खात्यातील तांत्रिक बिघाड दूर करण्याच्या बहाण्याने अज्ञाताने बँकेच्या खात्यातील २६ हजार ३६६ रुपये आॅनलाईन लंपास केले. फसवणुकीचा हा प्रकार ३० आॅक्टोबरला घडला. याबाबत सुनील श्रीपती कांबळे (वय ४९, रा. माळवाडी, ता. करवीर) यांनी बुधवारी (ता. २५) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून, फिर्यादीच्या मोबाईलवर आलेल्या नंबरवरून संशयिताचा शोध सुरू आहे, असे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील कांबळे यांच्या मोबाईलवर ३० आॅक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास फोन आला. यावेळी आपण गुगल पे आॅफिसमधून बोलत असून, तुमचे गुगल पे खात्याचे पैसे बँक खात्यात जमा होत नाहीत. त्यामुळे पैसे जमा होण्यासाठी गुगल फॉर्मची लिंक मोबाइलवर डाउनलोड करावी लागेल, असे सांगण्यात आले.
यानंतर फिर्यादीच्या बँक खात्याची माहिती घेऊन मोबाइलवर बोलणाऱ्या अज्ञाताने आॅनलाइन २६ हजार ३६६ रुपये ट्रान्स्फर करून लंपास केले. खात्यातून रक्कम वजा झाल्याचा संदेशही कांबळे यांना मिळाला नव्हता. बँकेत जाऊन खात्यावरील रकमेची माहिती घेतल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत बुधवारी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.