लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंतप्रधान किसान पेन्शन योजनेंतर्गत बोगस लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांकडून शासनाने वसुली माेहीम राबवली होती. कोल्हापूर जिल्ह्यात ३८०० करदाते शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा दिल्या मात्र त्यातील एक हजार करदात्यांनी शासनाच्या नोटिशीला ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरु केली. पात्र शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांत सहा हजार रुपये दिले जातात. यामध्ये सरकारी कर्मचारी, मोठे करदाते शेतकरी यांना वगळण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सरकारी कर्मचारी व करदाते शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याबाबत तक्रारी आल्या होत्या. शासनाच्या वतीने या लाभार्थ्यांची जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये तपासणी केली. जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार २१ शेतकरी या योजनेतंर्गत लाभ घेत होते. त्यापैकी १४ हजार ४३७ खातेदार चुकीच्या पध्दतीने लाभ घेतल्याचे तपासणीस निदर्शनास आले होते. यामध्ये ज्यांच्या नावावर जमीन नाही, पती-पत्नी दोघेही लाभार्थी, सरकारी नोकरदार व कर भरणारे मोठे शेतकऱ्यांचा समावेश होता. तपासणीत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून शासनाने वसुली मोहीम राबवली होती. त्यानुसार संबधित लाभार्थ्यांना नोटिसाही लागू केल्या होत्या. करदात्यांकडून वसुली मोहीम राबवली आणि ३८०० पैकी २७७१ जणांकडून पैसे वसूल झाले आहेत. उर्वरित हजार लाभार्थ्यांकडून अद्याप पैसे वसूल झाले नसल्याचे समजते.
दृष्टिक्षेपात पीएम किसान योजना-
पीएम किसान पेन्शन योजनेचे लाभार्थी - ५ लाख ३७ हजार २१
पैसे परत करा म्हणून नोटीस पाठविलेले करदाते शेतकरी - ३८००
आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी - २७७१
पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी - १०२९
आतापर्यंत अडीच कोटीची वसुली
जिल्ह्यात १४ हजार ४३७ शेतकरी हे अपात्र ठरले आहेत. त्यापैकी बहुतांशी जणांनी पैसे भरले असून आतापर्यंत सुमारे अडीच कोटीची वसुली झाली आहे.
हजारो शेतकरी अद्याप लाभाविनाच
पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेचा अद्याप लाभ न मिळालेले हजारो शेतकरी आहेत. काही शेतकऱ्यांना या योजनेची माहितीही झालेली नाही तर काहीसाठी तांत्रिक अडचण येत असल्याने लाभापासून वंचित राहिले आहेत.
कोट-
ही योजना सुरू होऊन दोन वर्षे झाले खरे मात्र बँक पासबुकाची झेरॉक्स देऊनही खाते क्रमांक चुकतो कसा. माहिती भरणाऱ्या यंत्रणेची चूक मात्र शिक्षा शेतकऱ्यांना मिळत आहे. पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला तर बघूया, दुरुस्त करुया, या पलीकडे दुसरे उत्तरच मिळत नाही. मग काम सोडून कोणाच्या मागे किती दिवस लागायचे, इतर शेतकऱ्यांना आठ हप्ते मिळाले मात्र मला अद्याप एकही मिळालेला नाही.
- रामचंद्र विठ्ठल चौगुले (शेतकरी, हलकर्णी)