कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची तात्पुरती कंट्रोल रुमला बदली केली. दिवसभर ते सीसीटीव्हीच्या कंट्रोल रुममध्ये बसून होते. त्यांचा राजारामपुरीचा पदभार पासपोर्ट विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगले यांच्याकडे दिला आहे.मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रमध्ये कोल्हापुरात शांततेत आंदोलन सुरू असताना राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील हे पदाचा गैरवापर करून सोशल मीडियाद्वारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा अफवांचे संदेश पाठवित आहेत.
आज, गुरुवारच्या ‘बंद’ आंदोलनात समाजमाध्यमांद्वारे काही तेढ निर्माण झाल्यास त्यास पोलीस निरीक्षक पाटील हेच जबाबदार राहतील. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करावे, या मागणीचे निवेदन बुधवारी (दि. ८) सकल मराठा समजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिले होते.
त्यानुसार देशमुख यांनी पोलीस निरीक्षक पाटील यांची तात्पुरती नियंत्रण कक्षाकडे बदली केली. त्यामुळे गुरुवारी दिवसभर पाटील नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर नजर ठेवून होते. त्यांचा राजारामपुरीचा पदभार पोलीस निरीक्षक प्रवीण चौगले यांच्याकडे दिला आहे. ही बदली बंदच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिली.