सदाशिव मोरे
आजरा : उष्ण व दमट हवामानामुळे आजरा तालुक्यात प्रतिवर्षी काजूचे उत्पादन चांगले होते. मात्र, अत्यल्प दर आणि काजू बोंडांवर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यामुळे हजारो टन काजू बोंडे (मुरटं) कुजत आहेत. त्यातच कोरोनामुळे काजू बोंडांची गोवा राज्यातून होणारी खरेदीही थांबली असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. काजू बियांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांप्रमाणे काजू बोंडांवरही प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची गरज आहे. आजऱ्याच्या काजूगराला ज्याप्रमाणे पौष्टिकता व चवदारपणा आहे, त्याचप्रमाणे काजू बोंडांमध्येही चवदारपणा आहे. ताज्या काजू बोंडांना गोव्यातून येणारे व्यापारी नाममात्र शुल्क देऊन खरेदी करून घेऊन जातात. मात्र, काजूच्या हंगामातच गेल्या व यावर्षी कोरोनाचे लाॅकडाऊन सुरू असल्याने काजू बोंडांची खरेदीच थांबली आहे. त्यातच कोरोनामुळे दुसऱ्याच्या बागेतील काजूबिया व बोंडे गोळा करण्यासाठी मजुरीने माणसेही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला गोव्याहून येणाऱ्या गाडीप्रमाणे ताजी काजू बोंडे गोळा करणे शक्य होत नाही. झाडावरून पडलेली काजूबोंडे सध्या झाडाखालीच पडून कुजून जात आहेत. काजूच्या बोंडाला मिळणारा दरही कमी आहे. त्यामुळेही काजू बोंडे गोळा करण्याकडे शेतकरी उदासीनता दाखवत आहेत. मजुरी जादा व काजूबोंडांचा दर कमी अशी विचित्र अवस्था आहे.
आजरा तालुक्यात जवळपास ५५ ते ६० गावांमध्ये काजूच्या बागा आहेत. काजू उत्पादनावर तालुक्यातील ४० ते ५० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल प्रत्येक वर्षी होत असते. अनेक गावांमध्ये शेताच्या बांधांवर काजूची झाडे लावल्यामुळे शेतकऱ्यांना ती प्रतिवर्षी उत्पन्न मिळवून देतात. अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या काजूच्या झाडांच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. चालू वर्षी काजू बागा सुरुवातीला मोहरल्या. मध्येच धुके व ढगाळ वातावरणाचाही परिणाम झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजूचे उत्पादन चांगले आहे. गेल्या चार दिवसांपासून पडणारा वळवाचा पाऊस याचाही चांगला फायदा काजूच्या बागांना झाला आहे. पुन्हा काजूच्या बागा मोहरल्या आहेत.
चौकट: काजू बोंडापासून फेनी उद्योगाची गरज
काजूच्या बोंडापासून गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात काजू फेनी तयार केली जाते, तसेच काजूच्या बोंडाचा रंग तयार करण्यासाठीही वापर केला जातो. गोवा राज्याप्रमाणे आजरा परिसरात काजू बोंडापासून फेणी व रस प्रक्रिया उद्योगाची गरज आहे. काजूच्या एका झाडापासून मिळणारी बोंडे किमान अंदाजे ८० ते ९० किलो मिळतात. मात्र, वेळेवर व ताजी बोंडे असतील तरच गोव्यातील टेम्पोधारक ती खरेदी करतात. अन्यथा ती जागेवरच कुजून जातात, तर या काजू बोंडाच्या डब्याला फक्त आठ रुपये मिळतात. त्यामुळे मजुराने काजू बोंडे गोळा करणे हे शेतकऱ्यांना न परवडणारे गणित आहे.
फोटो : २८ काजू बोंडे
कॅप्शन- कोळिंद्रे ( ता.आजरा ) येथे झाडाखालीच कुजून गेलेली काजूची बोंडे.