कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी दिल्लीत होणाऱ्या देशव्यापी आंदोलनासाठी शनिवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हजारो कार्यकर्ते कोल्हापुरातून रेल्वेने रवाना झाले. उसाच्या मोळ्या, फुलांनी सजविलेल्या बोग्या आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ध्वज व ‘एकच गट्टी, राजू शेट्टी’ अशा घोषणा देत रेल्वेस्थानक यावेळी दुमदुमून गेले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह सीमाभागातील साधारणत: दोन हजारपेक्षा अधिक शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला गेले.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने दिल्ली येथे उद्या, सोमवारी देशव्यापी आंदोलन होणार आहे. यासाठी येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे सकाळपासून वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत विविध भागांतून शेतकरी बांधव आले होते. त्यांच्यामध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. ‘या सरकारचे करायचे तरी काय, खाली डोके वर पाय’, अशा घोषणा रेल्वेस्थानकावर दिल्या. सकाळी साडेआठच्या सुमारास राजू शेट्टी यांचे रेल्वेस्थानकावर आगमन होताच, हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
या आंदोलनासाठी ‘स्वाभिमानी किसान एक्सप्रेस’ ही स्वतंत्र रेल्वे करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी कोणतीही घाईगडबड करू नये, सर्वांना रेल्वेत जागा बसण्यास मिळणार आहे. त्यामुळे कोणी चिंता करण्याचे कारण नाही, अशी माहिती माईकवरून कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात येत होती.
सकाळी सव्वानऊ वाजता खासदार शेट्टी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व हिरवा झेंडा दाखवून स्वामिभानी किसान एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, माजी जि. प.चे बांधकाम सभापती अनिल मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, सागर शंभुशेटे, राम शिंदे यांच्यासह हजारो कार्यकर्र्ते रेल्वेतून रवाना झाले.
मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : राजू शेट्टीलोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेवर आले; पण गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विश्वासघात केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.यावेळी शेट्टी म्हणाले, इतिहासात देशपातळीवर पहिल्यांदाच शेतकरी या आंदोलनानिमित्त एकत्र आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्चावर दीडपट हमीभावाचे आश्वासन दिले; पण त्यांनी ते पाळले नाही. संपूर्ण शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा व्हावा आणि उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव मिळाला, या मागणीसाठी शेतकरी एकत्र आला आहे.
लोकवर्गणीतून अख्खी रेल्वे बुक केली आहे. हे इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी महिलांही येणार असून, केंद्र सरकारने मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतल्याशिवाय आता माघार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राजु शेट्टी झाले रेल्वेचालकदिल्लीला जाण्यासाठी स्वाभिमानी किसान एक्सप्र्रेसच्या इंजिन रुममध्ये जाऊन खुद्द खा. राजू शेट्टी यांनी रेल्वे सुरू केली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
या आहेत मागण्या...
- स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा,
- उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळावा,
- संपूर्ण शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा करा.
स्वाभिमानी किसान एक्सप्रेसमध्ये अशी व्यवस्था...
- १८ बोगी ( स्लिपर क्लास)
- दोन एसएलआर (जनरल डबे)
- किचन