कोल्हापूर : दरमहा १५ टक्के परतावा आणि दहा महिन्यांत गुंतवलेल्या रकमेच्या दीडपट रक्कम देण्याचे आमिष दाखवून सांगली येथील पिनॉमिक ए.एस. ग्लोबल कंपनीने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. याबाबत नोव्हेंबर २०२२ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी कंपनीच्या तीन एजंटना अटक केली. न्यायलयात हजर केले असता, तिन्ही संशयितांची पोलिस कोठडीत रवानगी झाली. दरम्यान, फसवणुकीची व्याप्ती वाढली असून, राधानगरी तालुक्यातील शंभराहून जास्त गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला.
नितीन रवींद्र परीट (वय ३२, रा. सोळांकूर, ता. राधानगरी), मल्लाप्पा आप्पा पुजारी (वय ४८, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) आणि भैरवनाथ निवृत्ती पालकर (वय ५३, रा. पालकरवाडी, ता. राधानगरी) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. या तिघांसह गुन्ह्यातील मुख्य आरोपी पंकज नामदेव पाटील, अभिजीत श्रीकांत जाधव (दोघे रा. तासगाव, जि. सांगली) आणि संतोष गंगाराम घोडके (वय ३९, रा. यरगुट्टी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) या सहा जणांवर गुन्हा दाखल आहे. याबाबत अमोल धोंडिराम शेटके (वय ३८, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पिनॉमिक कंपनीचा प्रमुख पंकज पाटील याने कोल्हापूर जिल्ह्यातील गुंतवणूक जमा करण्यासाठी नितीन परीट, मल्लाप्पा पुजारी आणि भैरवनाथ पालकर या तिघांची नियुक्ती केली होती. तिघांनी शहरात ठिकठिकाणी सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना दरमहा १५ टक्के आणि दहा महिन्यांत गुंतवलेल्या रकमेच्या दीडपट रक्कम परत देण्याचे आमिष दाखवले. कोणतेही लेखी करार नसताना आणि बहुतांश व्यवहार रोखीने होत असतानाही गुंतवणूकदारांनी विश्वास ठेवून लाखो रुपये कंपनीत गुंतवले. सुरुवातीचे काही महिने १५ टक्के परताव्याची रक्कम देऊन कंपनीने गाशा गुंडाळला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. एक कोटी ८३ लाखांची फसवणूक झाल्याचा उल्लेख फिर्यादी शेटके यांच्या जबाबात आहे.
राधानगरी तालुक्यातही गंडा
पिनॉमिक कंपनीने राधानगरी तालुक्यातील शंभराहून अधिक गुंतवणूकदारांना सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत काही गुंतवणूकदारांनी सोमवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवले. फसवणुकीचा प्रकार जानेवारी २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या काळात घडला. याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.