लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: राज्याच्या नगरविकास विभागाकडून खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नामुळे नगर परिषदांसाठीच्या वैशिष्यपूर्ण काम या योजनेतून कागल, मुरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड नगरपंचायतींना साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे हायमास्ट, अंतर्गत रस्ते, नदीघाट, पुतळा सुशोभीकरण, कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
खासदार मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मुरगड, कागल गडहिंग्लज या तीन नगर परिषदा आणि आजरा, चंदगड या नगरपंचायतींना वैशिष्ट्यपूर्ण कामांकरिता जास्तीत जास्त निधी मिळावा यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आराखडा पाठविला होता. निधी द्यावा म्हणून सातत्याने पाठपुरावाही केला होता. त्याला चांगले यश आले असून अव्वर सचिव विवेक कुंभार यांच्या सहीने या पाचही नगरपंचायतींना निधी मंजुरीचे शासन आदेश प्राप्त झाले आहेत. हा निधी विनाकपात देण्यासह कोणत्याही परिस्थितीत मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याचेही बंधन घालण्यात आले आहे. शिवाय कार्यान्वयन यंत्रणा या नात्याने या नगरपालिकांनी ई निविदा, प्रशासकीय मान्यता पारदर्शीपणे राबविण्याचेही आदेश दिले आहेत.
चौकट ०१
गडहिंग्लज : ७५ लाख
होणारी कामे: हिरण्यकेशी नदीघाटाचे संवर्धन व विकसित करणे. दशक्रियेसाठी रूम, चेंजिंग रूम, पारकट्टा बांधकाम, संरक्षक भिंत, दगडी पायरी वाढीव बांधकाम, पाछवे करणे, स्वच्छतागृह बांधकाम
चौकट ०२
आजरा : १ कोटी ३५ लाख
होणारी कामे: ओल्या कचऱ्यापासून विद्युत निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करून विजेची बचत करणे
चौकट ०३
मुरगूड : १ कोटी
होणारी कामे: मुरगड नगरपालिका वाढीव पाणी पुरवठा योजनेकरिता नगरपंचायत हद्दीतील रस्त्याची खुदाई झाल्याने अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण होणार
चौकट ०४
कागल : १५ लाख
होणारी कामे : आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसवले जाणार
चाैकट ०५
चंदगड : २० लाख
होणारी कामे: शिवाजी महाराजांच्या शिवशक्ती स्थळासभोवती बगिचा व मूलभूत सुविधा पुरविणे