लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियानातून कोंबड्या, शेळी-मेंढी आणि वराह पालनासाठी २५ आणि ५० लाख अनुदान देणाऱ्या तीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. याचे निकष निश्चित करण्याचे काम राज्य पातळीवर सुरू असून लवकरच ते जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या योजनांसाठी कोणतेही आरक्षण नसून त्या सर्वांसाठी खुल्या आहेत.
या अभियानातून पशुसंवर्धनाला गती देण्यासाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोंबडी पालनासाठी पोल्ट्रीची योजना असून याला अधिकाधिक २५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. शेळी-मेंढीसाठी ५० टक्के म्हणजे ५० लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. वराह पालनासाठीही ५० लाखांचे अनुदान देण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपन्या, सेक्शन ८ खाली नोंदणीकृत असलेल्या कंपन्या या प्रकल्पांसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून निकषांची यादी महाराष्ट्र शासनाकडे आली असून तेथून मराठीतील निकष जाहीर करण्यात येणार आहेत.
याआधी महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना या आरक्षित घटकांसाठी असल्याने खुल्या वर्गातील घटकांना मर्यादित लाभ मिळत होता. परंतु या नव्या तीन योजना सर्वांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.
चौकट
छोट्या शेतकऱ्यांचा विचार आवश्यक
दरम्यान, या तीनही योजना बड्या शेतकऱ्यांसाठी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विशेष घटकमधून काही योजना आहेत. परंतु त्या आरक्षित घटकांसाठी आहेत. खुल्या गटातील शेतकरी किंवा घटकांसाठी जिल्हा परिषदेकडून योजना नाहीत. त्यामुळे या निधीतून छाेट्या शेतकऱ्यांसाठी योजना घेण्याची गरज व्यक्त होत आहे.