कोल्हापूर : कसबा बावडा रोडवर न्यायसंकुलानजीक शनिवारी झालेल्या इरफान महंमद अली नाकाडे (वय ४०, रा. न्यू शाहूपुरी) याच्या मृत्यूप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी रविवारी रात्री तिघांना अटक केली.
नजीर मन्सूर शेख (वय ४२, रा. रेणुका मंदिरानजीक, कसबा बावडा), आकाश शशिकांत जाधव (४०, रा. महाकाली मंदिर, शिवाजी पेठ), नीलेश अजित मुसळे (३२, रा. आर. के.नगर) अशी तिघांची नावे आहेत; तर सहाजणांवर गुन्हा नोंद केला.लहान मुलांतील वादाचा जाब विचारण्यासाठी व वाद मिटवण्यासाठी न्यू शाहूपुरीतील दहा ते बाराजण एका चारचाकी वाहनातून कसबा बावडा येथे गेले होते. दोन गटांत शाब्दिक बाचाबाचीनंतर वाद वाढला व हाणामारी झाली.
हल्लेखोरांच्या तावडीतून सुटून इरफान नाकाडे पळून गेले. त्यांचा पाठलाग केल्यानंतर न्यायसंकुलानजीक ते खाली पडले. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एकूण सहाजणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यातील तिघांना रविवारी रात्री उशिरा अटक केली.दरम्यान, या प्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली. समीना नजीर शेख (रा. रेणुका मंदिर, कसबा बावडा रोड) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, लहान मुलांचे शाळेत झालेला वाद मनात धरून जैद हकीम व त्याचे वडील, खलील नाकाडे व त्याचे वडील, आदी १० ते १२ जण एका चारचाकी वाहनातून रेणुका मंदिराच्या परिसरात आले. त्यांनी शेख यांचा मुलगा तसेच पती नजीर शेख, सम्राट दिलीप माळी या तिघांना मारहाण केली. या प्रकरणी दहाजणांवर गुन्हा नोंद झाला.