कोगनोळी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाकडून राज्याच्या आंतरराज्य सीमेवर कसून तपासणी केली जाते. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल बंधनकारक आहे त्याशिवाय कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जात नाही. याला पर्याय म्हणून काही खासगी बसेसने खुश्कीच्या मार्गाने राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला अशा दोन बसेसवर कारवाई दोनच दिवसांपूर्वी करण्यात आली होती.
त्यानंतर बनावट आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल दाखवून राज्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या खाजगी बस मधील बारा जणांवर गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेण्याची कारवाई निपाणी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे केली.सुरेश शिवाप्पा माडहळळी (विद्या नगर हुबळी), सतीश पांडूरंग शिंदे (वाई जि.सातारा), व जगदीश नारदनहल्ली या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली आदींनी केली.कर्नाटकात प्रवेश करत असलेल्या खाजगी बस मधील काही प्रवाशांनी कोगनोळी येथील आंतरराज्य सीमेवर तैनात असणाऱ्या तपासणी पथकातील अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेल्या निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल दाखवला यावेळी तो अहवाल बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने नऊ व्यक्तींवर गुन्हा दाखल करून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तीन बस मॅनेजर, तीन एजंट, दोन चालक व एक क्लिनर अशा नऊ व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.