कोल्हापूर : इचलकरंजी येथील दातार मळा येथील एका कारखान्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
मुख्य संशयित जीवन धोंडिबा वरुटे (वय २४ रा. दातार मळा, लिंबू चौक, इचलकरंजी), त्याचे दोन साथीदार सागर शिवानंद कडलगे (२१ रा. संभाजी चौक, लंगाटे मळा, इचलकरंजी) रोहित राजू कांबळे (१९ रा. दुसरी गल्ली, दातार मळा, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांचेकडून दहा लाख एक हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तीन महिन्यापासून नोटा तयार करुन दैनंदिन व्यवहारात खपविल्या जात होत्या, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैशाचे वाटप होण्याची शक्यता गृहित धरुन बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस हवालदार श्रीकांत मोहिते यांना इचलकरंजी येथील दातार मळा येथे संशयित जीवन वरुटे हा बनावट नोटांची छपाई करुन व्यवहारात वापरत असल्याची माहिती मिळाली. त्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने दातार मळा परिसरात सापळा रचला.
गुरुवारी त्याच्या घरावर छापा टाकला असता ताब्यातून दोन हजार रुपयांच्या २० बनावट नोटा सापडल्या. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सागर कडलगे, रोहित कांबळे याच्या मदतीने नोटा तयार करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांच्या घराची झडती घेतली असता लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर, कटर मशीन सापडले. त्यांच्या ताब्यातून दोन हजार, पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयाच्या एकूण १० लाख १ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्या तयार करण्यासाठी वापरलेले १० हजार ५०० रुपयांचे साहित्यही जप्त करण्यात आले.
संशयितांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत बनावट नोटा बनविणारे रॅकेट सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. या नोटांचा निवडणुकीत वापर झाला आहे काय, याची चौकशी पोलीसांनी तिघा संशयितांकडे केली असता बनावट नोटा दैनंदिन व्यवहारात खपविल्या जात होत्या, अशी कबुली दिली.
दरम्यान संशयित जीवन वरुटे याच्यावर इचलकरंजी येथे मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, पोलिस हवालदार श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, विजय गुरखे, किरण गावडे, उत्तम सडोलीकर, श्रीकांत पाटील, वैभव पाटील, संजय पडवळ यांनी केली.