कोल्हापूर : कर्नाटकातून कोल्हापुरात हस्तिदंतांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन महिलांसह तिघांना आज, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित युवराज हरेशा राजपूत (वय १९), शाला शांतरा राजपूत (४०), सुधा लिंगेशा राजपूत (३५, सर्व रा. गौतमनगर शिमोगा, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून आठ लाख किमतीचे हस्तिदंत पोलिसांनी जप्त केले. बनावट गिऱ्हाईकाद्वारे सापळा लावून लक्ष्मीपुरी पोलिसांनी ही कारवाई केली. कर्नाटकातील दोन महिला व एक तरुण गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात हस्तिदंताची विक्री करण्यासाठी गिऱ्हाईक शोधत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकाद्वारे युवराज राजपूत याच्याशी संपर्क साधला असता त्याने आम्ही तावडे हॉटेल परिसरात उतरलो असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना हस्तिदंत हवे आहेत, तर तुम्ही लक्ष्मीपुरी बकरी बाजार येथे येण्यास सांगितले. दुपारी चारच्या सुमारास युवराज हा शाला व सुधा राजपूत या दोन महिलांना सोबत घेऊन आला. त्यांनी पिशवीमध्ये हस्तिदंत ठेवले होते. पोलिसांनी ठरल्याप्रमाणे बनावट गिऱ्हाईकास त्यांच्या समोर पाठविले. ते पिशवीमधील हस्तिदंत दाखविताना पोलिसांनी तिघांना रंगेहात पकडले. पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये ३ हस्तिदंत, २ हस्तिदंताचे कडे असा १६०० ग्रॅम वजनाचे हस्तिदंत मिळून आले. बाजारभावाने त्यांची आठ लाख किंमत होते. त्यांनी हे हस्तिदंत कुठून आणले याबाबत विचारणा केली असता, ते सांगण्यास टाळाटाळ करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीस त्यांच्याकडे चौकशी करीत होते. उद्या, मंगळवारी वनअधिकाऱ्यांच्या ताब्यात त्यांना देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून आणखी हस्तिदंत हस्तगत होण्याची शक्यता असल्याचे गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हस्तिदंताची विक्री करणाऱ्या तिघांना अटक
By admin | Published: September 16, 2014 12:33 AM