कोल्हापूर : पंचगंगा घाट व रंकाळा पदपथ उद्यान येथे देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना जुना राजवाडा पोलीस व दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी दुपारी सापळा रचून पकडले. संशयित आरोपी राजेंद्र बाळासाहेब शेळके (वय ३६, रा. जीवबा नाना पार्क, नवीन वाशी नाका) व विनायक साजन मुधोळकर (२५, रा. भोईगल्ली, शुक्रवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन पिस्तुले, दोन मॅगझिन व ४७ काडतुसे असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यामागे हत्यारे पुरविणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त करीत पोलीस तपास करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डी. एम. गायकवाड हे हद्दीमध्ये गस्त घालत असताना त्यांना जुना वाशी नाका येथे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शेळके पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा लावला असता तो मोपेडवरून रंकाळा पदपथ उद्यान चौकात आला. यावेळी पाळत ठेवून असलेल्या पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता पिस्तूल, दोन मॅगझिन व ४१ काडतुसे मिळून आली. दरम्यान, शेळके याला न्यायालयात हजर केले असता १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, दहशतवादविरोधी पथकाचे हवालदार श्रीकांत मोहिते, उत्तम सडोलीकर यांना विनायक मुधोळकर हा पिस्तूल विक्रीसाठी पंचगंगा घाट येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून मुधोळकरलाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ दोन पिस्तुले व सहा काडतुसे मिळून आली. या दोघांनाही पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी ती विक्रीसाठी घेऊन आल्याचे सांगितले. शेळके याने दोन वर्षांपूर्वी निपाणी येथून पिस्तूल खरेदी केल्याचे सांगितले. या दोघांनी पिस्तूल कोठून खरेदी केले, ते कोणाला विक्री करणार होते, विकत घेणाऱ्या व्यक्तीचा नेमका काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. शेळके व मुधोळकर हे ऐन महापालिका निवडणुकीतही जवळ पिस्तूल बाळगून होते. त्यांनी कोणाला हत्यारे विक्री केली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी) बिहारमधून पुरवठा पोलिसांनी जप्त केलेली पिस्तुले उच्च दर्जाची आहेत. त्यांचा आकार छोटा व आकर्षक असून क्षमताही मोठी आहे. अशा पद्धतीची पिस्तुले बिहार येथून राज्यात आणली जात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. बाजारात या पिस्तुलांची किंमत दीड लाखापेक्षा जास्त आहे.
तीन बेकायदेशीर पिस्तुलांसह काडतुसे जप्त; दोघांना अटक
By admin | Published: November 08, 2015 12:47 AM