ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 17- कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावर आंबेवाडीपासून काही अंतरावर रेडेडोह येथे बुधवारी पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तीन मुले वाहून जाण्याची दुर्घटना घडली होती. यापैकी दोन मुले काही अंतरावर झाडावर अडकल्याने त्यांना वाचविण्यात यश आले; ओम अजित पाटील (१५) व शुभम् महालिंग लांडगे (१३, दोघेही रा. वडणगे, ता. करवीर) ही दोन मुले दुर्घटनेतून बचावली होती. ओम पाटील आणि शुभम लांडगे यांना वाचविणारे रोहित पाटील आणि रौनिक पाटील, वडणगे येथील साखळकर गल्लीतील जय हिंद स्पोर्ट्सच्या दीपक पाटील, नितीन साखळकर, मानसिंग साखळकर, शिवाजी लिके, अली साखळकर, धनाजी साखळकर, सतीश साखळकर, वैभव खुर्दाळे, आंबेवाडीतील सचिन आंबी, भरत मोरे, वैभव सपगार, गणेश पाटील या तरुणांनी एकत्र येऊन अंगातील शर्ट, पँट काढून एकत्र केले. हे सर्व एकत्र गाठी मारून त्याद्वारे शुभम पाटील याला प्रथम बाहेर काढले होते. त्यानंतर आंबेवाडी वीज वितरण केंद्रातील सौरभ पाटील या कर्मचार्याने तातडीने दोर आणून या दोरखंडाच्या साहाय्याने ओम पाटील यालाही सुखरूप बाहेर काढले होते.